तीन गावे तीन महिन्यांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:00:07+5:30

तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या एकताई, सलिता आणि भांडूम या तीन गावांचा तीन महिन्यांपासून विद्युत पुरवठा पूर्णत: खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्येसुद्धा वीजपुरवठा सुरू असल्याचा मोठा गाजावाजा केला. परंतु, मेळघाटातील त्या तीन गावांतील अंधारामुळे तो दावा तद्दन खोटा ठरला आहे.

Three villages have been in darkness for three months | तीन गावे तीन महिन्यांपासून अंधारात

तीन गावे तीन महिन्यांपासून अंधारात

Next
ठळक मुद्देमेळघाट : महावितरणचा कारभार, जारिदा उपकेंद्र वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : महावितरणच्या बेताल कारभाराचा फटका मेळघाटच्या अतिदुर्गम तीन गावांना बसला आहे. या गावांना विद्युत पुरवठा करणारी केबल वनविभागाच्या वृक्षतोड मोहिमेत तुटल्याने ही गावे तीन महिन्यांपासून अंधारात आहेत. दुसरीकडे तीन वर्षांपासून जारिदा उपकेंद्र अधिकाऱ्यांविना वाऱ्यावर आले आहे.
तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या एकताई, सलिता आणि भांडूम या तीन गावांचा तीन महिन्यांपासून विद्युत पुरवठा पूर्णत: खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्येसुद्धा वीजपुरवठा सुरू असल्याचा मोठा गाजावाजा केला. परंतु, मेळघाटातील त्या तीन गावांतील अंधारामुळे तो दावा तद्दन खोटा ठरला आहे.
अचलपूर येथील कार्यकारी अभियंता या विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चिखलदरा पंचायत समितीचे सदस्य नानकराम ठाकरे यांनी तक्रारीत केला आहे. एकताई, सलिता, भांडूम या गावांमध्ये पूर्णत: अंधाराचे साम्राज्य आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत हिंस्त्र वन्यप्राणी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून गावानजीक येतात. अंधारात ते दबा धरून बसण्याची शक्यता असल्याने त्यांच्या भीतीखाली आदिवासी जगत आहेत.
वीजपुरवठा नसल्याने पाणीपुरवठा योजना व पीठ गिरणीसुद्धा बंद पडल्या आहेत. याशिवाय वीजपुरवठा नसल्याने नागरिकांना इतरांशी संपर्क साधणेदेखील अवघड ठरले असल्याने समस्यांत भर पडली आहे. 

वनविभागामार्फत जंगलात वृक्षतोड करण्यात आली. त्यामध्ये सदर केबल तुटला. ती जोडणी करण्यासाठी संबंधित कंपनीला आवश्यक असलेले मटेरियल लॉकडाऊनमध्ये मिळाले नाही . लवकरच तिन्ही गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल.
- व्ही .एम. बागडे,
सहायक अभियंता (महावितरण), परतवाडा

Web Title: Three villages have been in darkness for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज