मोर्शी / अमरावती : गेल्या काही काळापासून केवळ अमरावती शहरातच मर्यादित असलेल्या जीवघेण्या एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जचा विळखा आता ग्रामीण भागातही पसरू लागला आहे. मोर्शी पोलिसांनी १३ मे रोजीच्या मध्यरात्री एका धाडसी कारवाईत दोन सराईत गुन्हेगारांना एमडी ड्रग्जसह अटक केली आहे. विशेष म्हणजे, चार वर्षांपूर्वी अंजनगाव सुर्जी भागात अशा प्रकारची कारवाई झाली होती; त्यानंतर ग्रामीण भागात झालेली ही पहिलीच मोठी आणि खळबळजनक कारवाई ठरली आहे.
अमरावती ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी अवैध धंद्यांविरुद्ध आक्रमक पाऊले उचलण्याचे निर्देश दिले होते. याच दरम्यान चांदूरबाजार ते मोर्शी मार्गावर एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून गोवंश तस्करीच्या नावाखाली अमली पदार्थांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले मिळाली. त्याआधारे पोलिसांनी स्मशानभूमीसमोरील रेल्वे गेटजवळ सापळा रचला. मध्यरात्री २:३० च्या सुमारास संशयास्पद कार अडवून झडती घेतली असता, त्यात एमडी ड्रग्जचा साठा आढळून आला. या कारवाईत नायब तहसीलदार सागर ढवळे आणि फॉरेन्सिक टीम देखील उपस्थित होती.
पोलिसांनी आरोपींकडून ५० हजार रुपये किमतीचे ७५ ग्रॅम एमडी तथा ४ लाख रुपये किमतीची कार व ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी अब्दुल हफिज अब्दुल मजीद (वय ३९, रा. बिसमिल्लाह नगर, अमरावती) व अकिल अहमद जमील अहमद (वय ३२, रा. रहमतनगर, लालखडी, अमरावती) या दोघांना अटक करण्यात आली. सुरुवातीला या दोघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कसून चौकशी केल्यानंतर त्यांचे पितळ उघडे पडले. त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
४ वर्षांचा दुष्काळ संपला, पण चिंता वाढली!
अमरावती ग्रामीणमध्ये एमडीची तस्करी रोखण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. चार वर्षांपूर्वी दर्यापूर-अंजनगाव पट्ट्यात एमडी पकडले गेले होते, त्यानंतर आता थेट मोर्शीत ही कारवाई झाली आहे. शहरातून ग्रामीण भागात हे अमली पदार्थ कोण पुरवत आहे, याचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राहुल आठवले, पीएसआय आकाश शिवणकर, तुषार चव्हाण आणि त्यांच्या टीमने यशस्वी केली आहे.
Web Summary : Amravati police seized MD drugs in Morshi, arresting two. This marks the first major rural drug bust in four years, raising concerns about expanding networks.
Web Summary : अमरावती पुलिस ने मोर्शी में एमडी ड्रग्स जब्त किए, दो गिरफ्तार। यह चार वर्षों में पहली बड़ी ग्रामीण ड्रग जब्ती है, जो बढ़ते नेटवर्क के बारे में चिंता पैदा करती है।