लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या परतवाडा येथील लैंगिक अत्याचार, आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रीकरण ते व्हिडीओ, फोटो सोशल व्हायरल केल्याच्या गंभीर प्रकरणात शनिवारी एका १५ वर्षीय पीडितेचे बयाण नोंदवण्यात आले. मात्र, या बयाणात पीडितेने नेमकी काय माहिती दिली आणि तिच्या बयाणानंतर पोलिस आता कोणती भूमिका घेणार, याबाबत रविवारी दिवसभर प्रशासनाने प्रचंड गोपनीयता बाळगली. १३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी ही पीडिता बयाणासाठी समोर आली, हे विशेष.
अमरावती ग्रामीण पोलिस घटकात पोलिस निरीक्षक दर्जाची महिला अधिकारी उपलब्ध नसल्याने, या प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे यवतमाळ सायबर पोलिस स्टेशनच्या प्रमुख पोलिस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. मुनेश्वर आणि बालकल्याण समिती सदस्यांच्या उपस्थितीत नागपूरहून आलेल्या या पीडितेचे बयाण एका अज्ञात स्थळी नोंदवण्यात आले.
'ती' आठ पीडितांपैकी एक?
आरोपी अयान अहमद (१९, परतवाडा) याच्यासह आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. काही मुलींशी शारीरिक जवळीक साधून आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून ते सोशल व्हायरल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.यात एकूण आठ पीडितांची ओळख पोलिसांनी पटविली होती. त्यातील दोघींवर अत्याचार झाल्याचेही समोर आले होते. त्यानंतर वारंवार आवाहन करूनही पीडिता वा त्यांचे कुटुंबीय समोर येत नव्हते. मात्र, शनिवारी समुपदेशनानंतर एक पीडिता समोर आली. आठ पीडितांपैकी ती एक असल्याची माहिती एसआयटीने दिली होती.
आज होईल चित्र स्पष्ट
शनिवारी बयाण नोंदवूनही रविवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी कोणतीही अधिकृत ब्रिफिंग केलेली नाही. पोलिस अधीक्षक विशाल आनंद स्वतः पत्रकार परिषद घेऊन पुढील माहिती देतील, असे संकेत पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे, सोमवार, २० एप्रिल रोजी पोलिस किंवा एसआयटी या प्रकरणात नेमकी कोणती नवीन कलमे वाढवतात की नवा गुन्हा दाखल करतात आणि बयाणातून काय निष्पन्न झाले, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
Web Summary : A 15-year-old victim's statement was recorded in the Paratwada video scandal case. Police maintained strict confidentiality regarding the statement's details. The victim came forward after counseling. Eight arrests have been made. More information is expected to be revealed soon by police.
Web Summary : परतवाड़ा वीडियो कांड में 15 वर्षीय पीड़िता का बयान दर्ज किया गया। पुलिस ने बयान के विवरण के बारे में सख्त गोपनीयता बनाए रखी। पीड़िता परामर्श के बाद सामने आई। आठ गिरफ्तारियां हुई हैं। पुलिस जल्द ही अधिक जानकारी प्रकट करेगी।