Join us
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!

By मनीषा म्हात्रे | Updated: April 22, 2026 06:29 IST

ड्रग्ज सप्लायर अश्विनी पॉलचा माग काढणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. पण, त्यांनी भन्नाट आयडिया लढवली.

मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: ड्रग्ज सप्लायर अश्विनी पॉलचा माग काढणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. पण, त्यांनी भन्नाट आयडिया लढवली. पालिका सर्व्हेच्या नावाखाली टिटवाळा येथील पद्मावती कॉम्प्लेक्समध्ये एंट्री केली. अखेर अश्विनीचे घर सापडले आणि लगेच छापा घातला, तेव्हा अश्विनीने स्वतःला “बार गर्ल” असल्याचे सांगितले. पण, पोलिसांचे लक्ष घरातील कचऱ्याच्या डब्याकडे गेले आणि डबा उघडताच त्यात लपलेले ६ कोटींच्या ५ हजार एक्स्टसी गोळ्याचे गुपित समोर आले. चौकशीत तिचा लिव्ह-इन पार्टनर अमीर सय्यद हा ड्रग्ज पुरवठा करत होता आणि अश्विनी त्याची विक्री करायची. मंगळवारी रात्री उशिराने अमीरलाही अटक केली आहे. 

अमीर आणि अश्विनी दोघे मिळून हे रॅकेट चालवत होते. अमीरच्या चौकशीतून या पुढची लिंक हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अश्विनी दोन महिन्यांपूर्वीच टिटवाळा येथील घरात भाड्याने राहण्यास गेली होती. पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल ढोले आणि पथकाने तिचा शोध सुरू केला. यावेळी दोन-दोन पोलिसांच्या पथकाने पालिका अधिकाऱ्यांच्या बहाण्याने सर्व्हे सुरू केला. कुणालाही काही माहिती लागू न देता ते अश्विनीच्या घरापर्यंत पोहोचले. अश्विनीचे घर सापडल्याचा ग्रीन सिग्नल मिळताच पथकाने छापा टाकत झाडाझडती सुरू केली. या कारवाईने अश्विनीचा गोंधळ उडाला. मात्र, सुरुवातीला तिनेही आपण फक्त बार गर्ल असेपर्यंतची ओळख पुढे आणली. पोलिसांनी तिचे संपूर्ण घर पिंजून काढले, मात्र हाती काहीच लागले नाही. अखेरीस पोलिसांचे लक्ष कचऱ्याच्या डब्याकडे गेले. त्यांनी ते उघडताच हाती ६ कोटींचे ड्रग्ज लागल्याने अश्विनीचे बिंग फुटले.

कारागृहात जाण्यापूर्वी अश्विनीकडे दिला ड्रग्जचा साठा

अमीर कोर्टात तारखेला हजर राहत नसल्याने डीआरआयच्या प्रकरणात फेब्रुवारीत त्याच्याविरुद्ध वारंट जारी केले होते. कारागृहात जाण्यापूर्वीच फेब्रुवारीमध्ये अमीरने या गोळ्या अश्विनीकडे देत पुढे विक्री करण्यास सांगितले. जेणेकरून त्या विकून अमीरचा पुढचा कोर्ट प्रकरणाचा खर्चही भागेल. अमीर आणि इरफानची ओळख कारागृहात असतानाच झाली. अमीरने यापूर्वीही मोठ्या प्रमाणात गोळ्या इरफानला विक्रीसाठी दिल्याचा संशय आहे. तेथेच अमीरला भेटायला येताना अश्विनीची इरफानसोबत ओळख झाली. त्यानुसार, अमीरचा ताबा घेत त्याला अटक केली.

...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना

स्वतःची ओळख लपविण्यासाठी अश्विनी बनावट नावाचाही वापर करत होती. यासाठी ती रुकसाना शेख नावाने आधार कार्ड वापरत असल्याचेही समोर आले.

बँक खात्यासह मालमत्तेचा तपास सुरू

एवढ्या मोठ्या किमतीचा साठा घेण्यासाठी किमान १ कोटी तरी दिल्याचा अंदाज आहे. मात्र, हे ड्रग्ज घेण्यासाठी पैसे कुठून आले?, नेमका हा साठा किती आला होता?,  याच्या तपासासाठी तिच्या बँक खात्यासह मालमत्तांची माहिती काढण्यात येत आहे. बँक खात्यातील माहिती मिळताच पुढे ती रक्कम गोठविण्यात येणार आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Ashwini became Rukhsana to hide drug racket; shocking secrets revealed.

Web Summary : Police uncovered Ashwini Paul's drug operation in Titwala. Posing as surveyors, they found her stash of ₹6 crore worth of ecstasy pills hidden in a trash can. Ashwini and her partner, Amir Sayyed, ran the racket. She used a fake Aadhaar card under the name Rukhsana to conceal her identity. Further investigation of bank accounts is underway.
टॅग्स :अमली पदार्थमुंबईगुन्हेगारी