मध्य प्रदेशातून येणारी अवैध रेती पकडली; तीन ट्रक अन् ट्रॅक्टरसह ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By प्रदीप भाकरे | Updated: May 6, 2026 18:26 IST2026-05-06T18:19:51+5:302026-05-06T18:26:36+5:30
Amravati : नवनियुक्त पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी आल्या आल्या अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात होणारी अवैध रेती वाहतूक रोखली असून, तब्बल ८४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Illegal sand coming from Madhya Pradesh caught; Three trucks and tractors along with valuables worth Rs 84 lakh seized
अमरावती: नवनियुक्त पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी आल्या आल्या अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात होणारी अवैध रेती वाहतूक रोखली असून, तब्बल ८४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ६ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी तिवसा आणि शेंदूरजनाघाट पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई केली.
तिवसा परिसरातून दोन वाहने आणि शेंदूरजनाघाट परिसरातून दोन मोठी वाहने अशी एकूण चार वाहने अवैध रेतीसह ताब्यात घेण्यात आली आहेत. तिवसा पोलिस स्टेशनच्या हद्दीतून पाच ब्रास रेतीसह ट्रक जप्त करण्यात आला. यात फुलचंद हरसुले (३५, रा. परसापूर) आणि नीलेश गुडधे (अमरावती) या आरोपींना ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या कारवाईत एक ब्रास रेतीसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून अभिषेक मुसळे (२२) आणि अजय लोखंडे (५६, दोन्ही रा.आष्टी, जि. वर्धा) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
तर शेंदूरजनाघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ६ ब्रास रेती असलेला टिप्पर व मोबाइल जप्त करण्यात आले. यामध्ये अरविंद अंबाडकर (४७, रा. लोणी, ता.वरूड), क्रिश बडोदे (२१, मिर्झापूर, वरूड) आणि किशोर बेलसरे (धनोडी, वरूड) या आरोपींचा समावेश आहे. तसेच दुसऱ्या एका टिप्परवर कारवाई करत ७ ब्रास रेतीसह शेख जमीर (४५, शे.घाट), अल्ताफ शेख (२१, पुसला) आणि सय्यद असरार (रा.नरखेड, जि. नागपूर) यांना अटक करण्यात आली.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई नवनियुक्त पोलिस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलिस अधीक्षक डी. एल. तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण वानखडे, एपीआय अमोल मुडे, पीएसआय नितीन इंगोले यांच्यासह अंमलदार युवराज मानमोठे, रवींद्र वऱ्हाडे, सुनील महात्मे, चेतन दुबे, सागर नाठे, शांताराम सोनोने, प्रज्वल राऊत, नईम शहा व पथकाने केली आहे.