'मी तुला नवीन बॉयफ्रेंड शोधून देते!' भाचीने मामीला आणि मामेबहिणीला देहव्यवसायात ढकलण्याचा केला प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 19:01 IST2026-05-16T18:59:04+5:302026-05-16T19:01:06+5:30
Amravati : ज्या भाचीला पोटच्या मुलीप्रमाणे माया लावली, तिनेच आपल्या आईसमान मामीला आणि मामेबहिणीला देहव्यवसायाच्या नरकात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार येथे समोर आला आहे.

'I'll find you a new boyfriend!' Niece tries to push aunt and cousin into prostitution
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ज्या भाचीला पोटच्या मुलीप्रमाणे माया लावली, तिनेच आपल्या आईसमान मामीला आणि मामेबहिणीला देहव्यवसायाच्या नरकात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार येथे समोर आला आहे. मामा तर तुला सोडून गेले आहेत, आता मी तुम्हाला नवीन बॉयफ्रेंड शोधून देते, तुम्ही त्याच्यासोबत राहा, अशा निलाजऱ्या शब्दांत भाचीने मामीला धमकावत तिची होरपळ केल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे.
मामीसोबतच तिने आपल्या मामेबहिणीलदेखील देहविक्रयाच्या गर्तेत लोटण्याचा प्रयत्न केला. १८ जून २०२५ ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ही कौटुंबिक छळाची मालिका घडली. याप्रकरणी, ५० वर्षीय सुनीता (नाव बदललेले) यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी १४ मे रोजी पीडितेचा पती वामन (५०, रा. अमरावती), भाची माधुरी व वैशाली (४२) यांच्याविरुद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला. वामनने सुनीता हिला सोडून वैशाली या दुसऱ्या महिलेशी घरठाव केला आहे. पीडित महिलेचा २०२५ पासून आपल्या पत्नीला वाऱ्यावर सोडून वैशाली नावाच्या एका अन्य महिलेसोबत राहण्यास गेला आहे. पती सोडून गेल्याने आधीच खचलेल्या या महिलेला धीर देण्याऐवजी, तिच्याच भाचीने माधुरीने या परिस्थितीचा फायदा घेतला. माधुरीने आपल्या मामीवर आणि त्यांच्या तरुण मुलीवर देहव्यवसाय करण्यासाठी सतत दबाव टाकला. इतकेच नव्हे तर, मामा दुसरीकडे गेल्याने तिने मामीला लज्जास्पद प्रलोभने आणि धमक्या दिल्या.
पतीकडूनही छळ
तक्रारीनुसार, या महिलेचा छळ केवळ भाचीपुरता मर्यादित नव्हता. तर पती वामन याने फेब्रुवारी २०२६ मध्ये पीडितेच्या मर्जीविना शरीरसंबंध ठेवण्याचा बळजबरीने प्रयत्न केला. विरोध केला असता, तिला बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. वैशाली आणि भाची माधुरी हे दोघेही पीडितेच्या विरोधात वामनला सतत भडकवत असल्याचे समोर आले आहे. हिश्श्यावरील माहेरची शेती विकून आलेल्या २० लाखांपैकी एक रुपयाही आरोपींनी तिला मिळू दिला नाही.
स्त्रीधनाचाही अपहार
आरोपी पतीने पीडित महिलेचे संपूर्ण स्त्रीधन आणि माहेरून मिळालेले २० लाख रुपये स्वतःच्या घशात घातले असून, तिला आणि तिच्या मुलीला उदरनिर्वाहासाठी एक पैसाही दिला नाही. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा तिहेरी कात्रीत या मायलेकींना अडकवण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक शेंडोकार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पतीने ज्या महिलेशी घरठाव केला, तीदेखील फिर्यादीसह तिच्या दोन्ही मुलांना शिवीगाळ व मारहाण करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे, पतीने केलेल्या मारहाणीमुळे पिडिता ही दवाखान्यात भरती असताना आरोपी वामनने वैशाली ही आपली पत्नी आहे, ती तुम्हाला सांभाळायला तयार असल्याचे मुलांना सांगितले होते.