अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 10:55 IST2026-04-18T10:44:23+5:302026-04-18T10:55:21+5:30
अयानच्या स्नॅपचॅटमधील न्यूड व्हिडिओचा 'गेम' नेमका कसा झाला याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
Amravati Sexual Abuse Case: परतवाडा शहरातील अयान अहमद याने काही मुलींशी केलेली शारिरिक जवळीक, दोघींवर केलेला लैंगिक अत्याचार, त्या क्षणांचे केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग व ते व्हिडीओ-फोटो व्हायरल केल्याच्या प्रकरणाने आता भयानक वळण घेतले आहे. मुख्य आरोपी अयान अहमद याच्या कृत्यासोबतच त्याचे मित्र आणि काही महाविद्यालयीन तरुणांच्या शेअर फॉरवर्डमुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले आहे. अयानच्या स्नॅपचॅटमधील न्यूड व्हिडिओचा 'गेम' नेमका कसा झाला, याचा थरारक उलगडा पोलीस तपासात झाला आहे.
अयान आणि उजेरखान हे जिवाभावाचे मित्र. मात्र, महिनाभरापूर्वी एका पानटपरीवर अयान आपला मोबाइल विसरला आणि उजेरने याच संधीचा फायदा घेतला. अयानच्या मोबाइलचा लॉक कोड माहीत असलेल्या उजेरने त्याचे स्नॅपचॅट उघडले आणि तिथे अनेक मुलींचे आक्षेपार्ह न्यूड व्हिडिओ पाहून त्याची मती गुंग झाली. त्याने तत्काळ स्वतःच्या मोबाइलमध्ये स्नॅपचॅट डाऊनलोड करून ते सर्व व्हिडिओ चोरले. हे व्हिडिओ मो. साद आणि एहफाज खान यांना पाठवले आणि तिथून या व्हिडिओ कांडाचे बिंग फुटले. अयान हा अनेक मुलींना घेऊन अमरावती व अन्य ठिकाणी जात असतो, व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतो, हे उजेरला ज्ञात होते. किंबहुना फुशारकी मारण्यासाठी अयाननेही ती बाब उजेरला सांगितली होती.
शिक्षकाचाही सहभाग; फॉरवर्डची साखळी
या संपूर्ण साखळीत एका शिक्षकाचा हात असल्याचे समोर आले. परतवाड्यात शिकवणी वर्ग चालवणाऱ्या एहफाज खान याने आपल्या क्लासमधील मुलगी तर व्हिडिओत नाही ना, या नावाखाली ते व्हिडिओ पाहिले आणि पुढे इम्रान व नावेद यांना फॉरवर्ड केले. या साखळीत एकूण सहा जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. दुसऱ्या साखळीत उजेरने ते व्हिडीओ मो. साद व तबरेज खान यांना पाठविले.
राष्ट्रीय महिला आयोगाकडून आढावा
शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासाचा संपूर्ण आढावा घेतला. यापूर्वी राज्य अल्पसंख्याक आयोग व महिला व बालकल्याण
विभागाने अमरावती व परतवाडा गाठून वास्तव जाणले होते.
भाड्याचा फ्लॅट की 'लैंगिक अत्याचाराचा अड्डा'
दुसरीकडे, कठोरा नाका परिसरातील मानव सुगंधे या तरुणाने आपला भाड्याचा फ्लॅट अयान अहमदला भाड्याने कसा दिला, याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. केवळ टू-बीएचके फ्लॅटचे भाडे परवडत नाही म्हणून 'तासिका तत्त्वावर' मुले-मुलींना फ्लॅट देण्याचा पार्टटाईम बिझनेस येथे सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अनेक मोबाइल जप्त केले असून, या विकृत साखळीत आणखी किती जण अडकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तथा डिलिट डेटा रिकव्हर केला जात आहे.
पीयूषने मानवला पाडले बळी, पैसेही मिळू लागले
कठोरा नाका रोडवरील त्या फ्लॅटवर मानवसोबत पीयूष नामक तरुण राहायचा. तोदेखील आपले रुम पार्टनर फ्लॅटमध्ये नसताना काही युगुलांना तेथे बोलवायचा, तासाप्रमाणे पैसे आकारायचा. मात्र अन्य जणांनी त्यावर आक्षेप घेतला. पुढे पीयूषने तो फ्लॅट सोडला. मात्र, पीयूषला फ्लॅटबाबत विचारणा व्हायची. त्यावेळी चार पैसे अधिक मिळतात, असे म्हणत त्याने मानवला त्यासाठी प्रवृत्त केले. पीयूषच्या अन्य एका मित्राच्या साहाय्याने अयान हा मानव सुगंधे याच्या संपर्कात आला. मानव हा तासाला ५०० रुपये घेऊन युगुलांना फ्लॅट ऐय्याशीसाठी द्यायचा.