‘व्हायरल फिव्हर’ने चिमुकले अदमुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:55+5:30

पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना, आता व्हायरल फिव्हरनेही तोंड वर काढले आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, आता व्हायरल फिव्हर केव्हाही असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचा हा व्हायरल फिव्हर चिमुकल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने पालक वर्ग चिंतेत पडला आहे.

Admitted by 'Viral Fever' | ‘व्हायरल फिव्हर’ने चिमुकले अदमुसे

‘व्हायरल फिव्हर’ने चिमुकले अदमुसे

Next
ठळक मुद्देदररोज किमान २५ लहानगे दाखल : सरकारी, खासगी रुग्णालये फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वातावरण बदलाच्या घातक परिणामामुळे व्हायरल फिव्हरच्या विळख्यात अडकलेले चिमुकले अदमुसे झाले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज २५ ते ३० चिमुकले व्हायरल फिव्हरमुळे दाखल केले जात असून, खासगी रुग्णालयांची आकडेवारी यापेक्षाही अधिक आहे.
पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना, आता व्हायरल फिव्हरनेही तोंड वर काढले आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, आता व्हायरल फिव्हर केव्हाही असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचा हा व्हायरल फिव्हर चिमुकल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने पालक वर्ग चिंतेत पडला आहे. साधारणत: सर्दी, ताप व खोकला हे ऋतुमानानुसार होतच राहतात. मात्र, आता व्हायरल फिव्हरचा विळखा चांगलाच घट्ट होऊ लागला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा रुग्णांचा ओढा प्रचंड वाढलेला आहे. त्यात बहुतांश रुग्ण तापाचे असल्याचे आढळून आले आहे. सर्वाधिक प्रमाण हे चिमुकल्यांचे आहे. सहा महिने ते आठ वर्षांपर्यंतचे चिमुकले व्हायरल फिव्हरने अदमुसे झाल्याचे आढळून येत आहे. इर्विन रुग्णालयात दररोज २५ ते ३० चिमुकले दाखल केले जात आहेत. तापामुळे अशक्तपणा आलेल्या चिमुकल्यांना सलाइनद्वारे औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. दोन महिन्यात एक हजारांवर लहानग्यांना इर्विनमध्ये दाखल करण्यात आले असून, दहा दिवसांत ३०० हून अधिक मुलांवर उपचार करण्यात आलेला आहे.

खासगी रुग्णालयांतही रुग्णांची वाढती संख्या
जिल्ह्याभरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये व्हायरल फिव्हरने दाखल झालेल्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. जिल्ह्यात विविध आजारांवर उपचार करणारी सुमारे ५०० रुग्णालये आहेत. यापैकी दीडशे रुग्णालये बालरुग्णांवर उपचार करतात. या प्रत्येक रुग्णालयात व्हायरल फिव्हरने ग्रस्त चिमुकले आहेत.

अशी घ्यावी काळजी
लहान मुलांना आजारी रुग्णांच्या सपर्कात ठेवू नये. शाळेतील मुलांमधून हा संसर्ग पसरू शकतो. शिंकताना तोंडाला रुमाल लावावा. हात वारंवार स्वच्छ करावे. पौष्टिक आहार तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

व्हायरलसोबत अन्य आजारही वाढले
सर्दी, खोकला व व्हायरल फिव्हरसोबत चिमुकल्यांमध्ये मलेरिया, डेंग्यूसदृश आजार, न्यूमोनिया, टायफॉइड, डायरिया यांसारखे आजारही वाढत चालले आहेत. चिमुकल्यांच्या रक्तनमुने तपासणीतून ही बाब उघड झाली आहे.

वातावरण बदलामुळे सध्या व्हायरल फिव्हरचे प्रमाण वाढले आहे. दररोज २५ हून अधिक मुले रुग्णालयात दाखल केले जात आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.
- नीलेश पवार
बालरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, इर्विन रुग्णालय

Web Title: Admitted by 'Viral Fever'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.