खासगी सहापैकी चार रुग्णालयांमध्ये सुरू झाले लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 10:21 AM2021-03-04T10:21:25+5:302021-03-04T10:21:35+5:30

CoronaVaccine Akola काही तांत्रिक कारणांमुळे यापैकी केवळ चार रुग्णालयांमध्येच लसीकरणास प्रारंभ झाला

Corona Vaccination started in four of the six private hospitals | खासगी सहापैकी चार रुग्णालयांमध्ये सुरू झाले लसीकरण

खासगी सहापैकी चार रुग्णालयांमध्ये सुरू झाले लसीकरण

googlenewsNext

अकोला : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात शहरातील सहा खासगी रुग्णालयांमध्ये बुधवारपासून लसीकरण सुरू होणार होते; परंतु काही तांत्रिक कारणांमुळे यापैकी केवळ चार रुग्णालयांमध्येच लसीकरणास प्रारंभ झाला. उर्वरित दोन रग्णालयांमध्ये गुरुवारी ४ मार्चपासून लसीकरण सुविधा सुरू होणार असल्याची माहिती कोविड लसीकरण मोहिमेचे जिल्हा समन्वयक डॉ. मनीष शर्मा यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिक ४५ ते ६० वयोगटातील सहव्याधीग्रस्त व गंभीर आजार असलेल्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेस १ मार्चपासून सुरुवात झाली असून, यासाठी जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून एकूण १७ केंद्रांना मान्यता मिळाली आहे. सुरुवातीचे दोन दिवस सरकारी रुग्णालयांमध्ये लसीकरण पार पडल्यानंतर बुधवारपासून शहरातील सहा खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणास सुरुवात होणार होती. तथापि, यापैकी संत तुकाराम हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, माउली मॅटरनिटी व सर्जिकल हॉस्पिटल व शुक्ला मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या चार ठिकाणीच लसीकरणास प्रारंभ झाला. डॉ. के. एस. पाटील हॉस्पिटल ॲन्ड पॉलिक्लिनिक हॉस्पिटल व श्रीमती बी.एल. चांडक रिसर्च फाऊंडेशन (वसंती हॉस्पिटल) या दोन केंद्रांमध्ये गुरुवारपासून लसीकरणास प्रारंभ होणार आहे. महापालिकेचे हरिहरपेठ, सिंधी कॅम्प, कस्तुरबा आणि भरतीया ही चार केंद्र, सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा स्री रुग्णालय आदी केंद्रेही गुरुवारपासून सुरळीत सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

 

आणखी पाच केंद्रांचे प्रस्ताव

कोविड लसीकरण केंद्र स्थापन करण्याबाबत आणखी पाच खासगी रुग्णालयांकडून प्रस्ताव आले आहेत. याशिवाय इतरही रुग्णालये यासाठी इच्छुक आहेत. आज रोजी खासगी व सरकारी रुग्णालये मिळून जिल्ह्यात १५ केंद्रे असून, गुरुवारी या केंद्रांची संख्या १७ होणार आहे. नव्याने आलेल्या पाच प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास जिल्ह्यात २२ ठिकाणी लसीकरणाची सुविधा असणार आहे.

तांत्रिक अडचणीमुळे दोन खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण होऊ शकले नाही. या दोन रुग्णालयांमध्ये गुरुवारपासून नियमितपणे लसीकरण सुविधा उपलब्ध होणार आहे.

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला

Web Title: Corona Vaccination started in four of the six private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.