कोरोनाच्या संकटात संगमनेरचे लोकप्रतिनिधी कोठे होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:23 IST2021-09-21T04:23:59+5:302021-09-21T04:23:59+5:30

संगमनेर : कोरोनाच्या संकटात ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते मुंबईत जाऊन बसले होते. या संकटात तालुक्याचे लोकप्रतिनिधी खरेच कार्यरत होते ...

Where was Sangamner's MP in the Corona crisis? | कोरोनाच्या संकटात संगमनेरचे लोकप्रतिनिधी कोठे होते?

कोरोनाच्या संकटात संगमनेरचे लोकप्रतिनिधी कोठे होते?

संगमनेर : कोरोनाच्या संकटात ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते मुंबईत जाऊन बसले होते. या संकटात तालुक्याचे लोकप्रतिनिधी खरेच कार्यरत होते का? येथे खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लाखो रुपयांची लूट केली. त्याची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी टीका माजी विरोधी पक्षनेते व आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.

सोमवारी शहरातील मालपाणी लॉन्स येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने वज्रनिर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, सरचिटणीस सुनील वाणी, तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणफुले, नगरसेविका मेघा भगत, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, शिर्डी लोकसभा समन्वयक योगीराज परदेशी आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, सर्व सत्तास्थाने असताना संगमनेर तालुक्यातील लोकप्रतिनिधी नागरिकांसाठी कोविड सेंटर देखील सुरू करू शकले नाहीत. खासगी व्यवस्थेच्या भरोशावर रुग्ण सोडले. सर्वसामान्य माणसांचा मोठा पैसा खर्च झाला आहे. तीस वर्षांनंतर संगमनेरात उपजिल्हा रुग्णालय आले. त्यामुळे नेमका संगमनेरचा कोणता विकास झाला? तुम्ही सत्ता उपभोगायला आणि केवळ मंत्री म्हणून मिरवायला आहात का? असा सवाल त्यांनी केला.

केंद्र सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याला १५८ कोटी २७ लाख ५४ हजार रुपये मिळाले. मात्र, याचे श्रेय भलतेच घेत आहेत. केंद्र सरकारमुळे लस मिळाली. आपल्या राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले. मात्र, मुख्यमंत्री स्वतःचीच पाठ थोपटून घेतात. राज्यात अनेक योजना केंद्र सरकारच्या राबविल्या जातात, परंतु श्रेय भलतेच घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

...............

नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पहिला मेळावा संपन्न होतो आहे. संगमनेर तालुक्यात वाळू, खडी, प्लॉट ठेकेदार असून येथे भष्टाचार आणि ठेकेदार संस्कृती आहे. ही संस्कृती संपवायची असेल, तर ती सुरुवात संगमनेर नगरपरिषदेपासून केली पाहिजे. पुन्हा येऊन बुथनिहाय आढावा घेणार आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे रणशिंग विखे यांनी फुंकले.

Web Title: Where was Sangamner's MP in the Corona crisis?