महिला व बालकल्याण समिती सदस्य नियुक्तीसाठी बुधवारी सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:25 IST2021-08-27T04:25:35+5:302021-08-27T04:25:35+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी येत्या बुधवारी सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे. या सभेत ...

महिला व बालकल्याण समिती सदस्य नियुक्तीसाठी बुधवारी सभा
अहमदनगर : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी येत्या बुधवारी सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे. या सभेत महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या समितीवर कुणाला संधी मिळते याची उत्सुकता असून, सभापती, उपसभापती पदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
महापौर रोहिणी शेंडगे यांनी महिला व बालकल्याण समितीचे सदस्य नियुक्त करण्यासाठी १ सप्टेंबर रोजी सभा बोलविली आहे. मागील सभेत महिला व बालकल्याण समितीचे विसर्जन करण्यात आले आहे. त्यामुळे सभापती लता शेळके यांच्यासह समितीचा कार्यकाल संपुष्टात आलेला. महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची नव्याने सदस्य नियुक्ती करण्यासाठी सभा बोलविण्यात आली आहे. महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, बसपा, समाजवादी पार्टीचे सदस्य आहेत. या राजकीय पक्षांतून प्रमाणशीर प्रतिनिधित्वाव्दारे नामनिर्देशन पत्राव्दारे सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी गटनेत्यांना पत्र देण्यात येणार असून, गटनेत्यांच्या शिफारशीनुसार सदस्यांची नियुक्ती केली जाईल. या समितीवर जाण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे.
....
सभापती, उपसभापती पदासाठी रस्सीखेच
महापालिकेत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसची आघाडी आहे. सेनेकडे महापौर, तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. स्थायी समिती सभापतींसह उपमहापौर ही महत्त्वाची पदे राष्ट्रवादीकडे आहेत. काँग्रेसला मात्र एकही पद मिळालेले नाही. त्यामुळे काँग्रेसकडून सभापतिपदाची मागणी केली जाऊ शकते. त्यात सभापतिपदासाठी सेनेतून काहीजण इच्छुक आहेत. त्यामुळे सभापती व उपसभापती पदासाठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.