तिप्पट भाडे दरवाढ फेटाळली, इमारतींच्या पुनर्मूल्यांकनाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST2021-08-13T04:25:50+5:302021-08-13T04:25:50+5:30

अहमदनगर : महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या मालमत्तांचा वार्षिक भाडे दर तिप्पट करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावत इमारतींचे पुनर्मूल्यांकन करण्याचा महत्त्वपूर्ण ...

Triple rent hike rejected, revaluation of buildings approved | तिप्पट भाडे दरवाढ फेटाळली, इमारतींच्या पुनर्मूल्यांकनाला मंजुरी

तिप्पट भाडे दरवाढ फेटाळली, इमारतींच्या पुनर्मूल्यांकनाला मंजुरी

अहमदनगर : महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या मालमत्तांचा वार्षिक भाडे दर तिप्पट करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावत इमारतींचे पुनर्मूल्यांकन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल १६ वर्षांनंतर शहरातील इमारतींचे नव्याने मोजमाप करण्यात येणार असून, त्यानुसार कर अकारणी केली जाणार आहे.

महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ऑनलाइन सर्वधारण सभा झाली. शहरातील इमारतींचे पुनर्मूल्यांकन करून वार्षिक भाडे दरात तिप्पट वाढ करण्याचा विषय सभेसमोर होता. महापालिकेचे विविध कर, वार्षिक भाडे मूल्यांवर आकारले जाते. इमारतींच्या भाडे दरात तिप्पट वाढ करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला सर्वच पक्षांच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला. महापालिकेकडून पुरविल्या जाणाऱ्या रस्ते, वीज आणि पाणी यासह अन्य सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. त्यात कोरोनामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, असे असताना करवाढ कसली करता, असा सवाल ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, महापालिकेने उत्पन्न वाढविण्यासाठी अनधिकृत इमारती व नळांचा शोध घेऊन आकारणी करावी. एवढे जरी केले तरी महापालिकेचे उत्पन्न वाढेल. खासगी संस्थेमार्फत पुनर्मूल्यांकन न करता मनपाच्या कर्मचाऱ्यांकडून इमारतींचे सर्वेक्षण करून घ्यावे, जेणेकरून अनधिकृत इमारतींना आकारणी होईल. त्यासाठी प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांची पथके तयार करा, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी भाजपाच्या वतीने प्रशासनाच्या करवाढीचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले, नागरिकांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. इमारतींचे सर्वेक्षण करून सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या वतीने कुमार वाकळे यांनी बाजू मांडली. करवाढ न करता पुनर्मूल्यांकन करावे. जेणेकरून मनपाच्या उत्पन्नात वाढ होईल. स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी यापूर्वी नेमलेल्या संस्थेने काय काम केले, असा प्रश्न केला. त्यावर प्रशासनाने जीआयएसद्वारे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी नेमलेल्या मे. स्ट्रेसालाइट संस्थेने ५० हजार इमारतींचे सर्वेक्षण केले होते; परंतु त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या, तसेच अनेक तक्रारी आल्याने संबंधित कंपनीकडून काम काढून घेण्यात आले आहे, असा खुलासा प्रशासानाकडून करण्यात आला. माजी महापौर सुरेखा कदम यांनी सेनेच्या वतीने करवाढीचा निषेध केला. समाजवादी पार्टीच्या वतीने असीफ सुल्तान यांनी करवाढीचा निषेध केला.

....

...असा आहे महापौरांचा आदेश

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इमारती व जमिनीचे रिव्हिजन कर्मचाऱ्यांमार्फत किंवा खासगी एजन्सीकडून करण्यास ही सभा मान्यता देत आहे. सदर इमारतींना काेणत्याही प्रकारचे नवीन भाडे आकारणी न करता जुन्या दराप्रमाणे आकारणी करण्यात यावी.

....

कर्मचाऱ्यांची बाबूगिरी थांबवा

बोल्हेगाव येथील रस्त्यातील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत कुमार वाकळे यांनी नगररचना विभागाचे चांगलेच वाभाडे काढले. रस्ते कागदोपत्री रुंद दिसतात. प्रत्यक्षात मात्र ८ ते १० फूटच रस्ते शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे शहर बकाल होत चालले असून, जो चाेर नाही, त्याला चोरी करण्यास कर्मचारी भाग पाडतात. पदोपदी अडवणूक करून पैसे देण्यास मजबूर केले जात असून, याबाबत ठोस निर्णय घ्या, अशी मागणी वाकळे यांनी केली. हाच धागा पकडत रवींद्र बारस्कर यांनी परवानगीनुसार बांधकाम होते किंवा नाही, हेदेखील कर्मचाऱ्यांनीच पाहिले पाहिजे, असे बारस्कर म्हणाले.

...

पाणीपुरवठा विस्कळीत करण्याचा खोडसाळपणा

निर्मलनगर भागातील पाणीपुरवठा दीड महिन्यापूर्वी सुरळीत होता; परंतु गेल्या महिनाभरापासून तो विस्कळीत झाला आहे. पाणीपुरवठा विस्कळीत करण्याचा खोडळसाळपणा प्रशासनाकडूनच केला जात असल्याचा गंभीर आरोप विनीत पाऊलबुद्धे यांनी केला. त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर धारेवर धरत थातूरमातूर उत्तर देऊ नका. आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत बैठक होऊनही कुठलीही सुधारणा झाली नाही. हा आमदारांचा अवमान असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महापौरांकडे केली. सेनेचे गणेश कवडे यांनीही प्रशासनाकडून जाणीपूर्वक पाणीपुरवठा विस्कळीत केला जात असल्याचा आरोप केला.

....

खोकर नाल्यावर बिल्डरने बांधला पूल

आगकर मळा येथील खोकर नाल्यावर बांधकाम व्यावसायिकाने पूल बांधल्याचा मुद्दा उपस्थित करत ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवर चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, पाच एकर लेआउट मंजूर करून दिला. याबाबत ८ मे रोजी रीतसर पत्र देऊन नगररचना विभागाकडे माहिती मागविली; परंतु अद्याप माहिती मिळाली नाही. नगरसेवकांनाच माहिती मिळत नसेल, तर सामान्यांची काय अवस्था असेल, याची कल्पना न केलेलीच बरी, अशा शब्दांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

...

डिसेंबरपर्यंत महापुरुषांचे पुतळे बसविणार

शहरात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय झालेला आहे. याबाबत नगररसेवक कुमार वाकळे यांच्यासह अनिल शिंदे, सभापती अविनाश घुले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त शंकर गोरे यांनी डिसेंबरपर्यंत महापुरुषांचे पुतळे बसविण्यात येतील. त्यासाठी सदस्यांची एक समिती स्थापन करून विविध विभागांची ना हरकत मिळविण्यासाठी पाठपुरवा करण्याचे ठरले. महापुरुषांच्या पुतळे बसविण्याची कार्यवाही करण्यासाठी उपायुक्त यशवंत डांगे यांची नियुक्ती करण्यात आली.

....

महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची समिती

महापुरुषांचे पुतळे बसविण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे कुमार वाकळे, सेनेचे अनिल शिंदे, काँग्रेसकडून नगरसेविका रूपाली वारे, बसपाच्या अश्विनी जाधव, सपाचे आसिफ सुल्तान आणि भाजपाचे रवींद्र बारस्कर यांचा समावेश आहे.

....

Web Title: Triple rent hike rejected, revaluation of buildings approved