बिबट्यांच्या हल्ल्यात तीन मेंढ्या, एक कुत्रा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:27 IST2021-08-18T04:27:10+5:302021-08-18T04:27:10+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात दोन बिबट्यांच्या हल्ल्यात तीन मेंढ्या, एक कुत्रा ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ...

बिबट्यांच्या हल्ल्यात तीन मेंढ्या, एक कुत्रा ठार
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात दोन बिबट्यांच्या हल्ल्यात तीन मेंढ्या, एक कुत्रा ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. बिबट्याच्या वावराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जेऊरमधील चापेवाडी शिवारातील खंडोबा माळ परिसरात मेंढपाळ भिवा बिरू घुले हे आपल्या मेंढरांसह पाल ठोकून राहत होते. सोमवारी रात्री बिबट्याने त्यांच्या मेंढ्यांवर हल्ला करीत दोन मेंढ्या ठार केल्या. भिवा घुले यांनी आरडाओरडा करत बिबट्यांना हुसकावून लावले. दोन बिबटे असल्याचे घुले यांनी सांगितले.
बिबट्यांना हुसकावून लावले होते. मात्र, नंतर पुन्हा पहाटेच्या सुमारास दोन्ही बिबट्यांनी पालावर हल्ला करत एक मेंढी व कुत्र्याची शिकार केली. वनविभागाचे कर्मचारी संजय सरोदे, इमामपूर सरपंच भिमराज मोकाटे, मिठू ससे, सुभाष पवार, विकास म्हस्के यांनी घटनास्थळी भेट दिली. जेऊर परिसरात यापूर्वी बिबट्याने अनेक वेळा दर्शन दिलेले आहे. बिबट्याच्या वावराने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. मेंढ्या ह्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वनविभागाच्यावतीने ठसेही तपासण्यात आले.
------
जेऊर परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. गुराखी, शेतकरी व नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच वनविभागाने परिसरात पिंजरा लावावा.
-राजश्री मगर,
सरपंच, जेऊर