बेलापूर येथील बायपास रोड परिसरात राहणारे विराज उदय खंडागळे व सोमनाथ चिंतामणी यांच्या घरावर चार ते सहा चोरट्यांनी ही चोरी केली. ही दोन्ही घरे शेजारी आहेत. यात सोन्याच्या बांगड्या, कर्णफुले, गंठण व दहा हजार रुपयांची रोख रक्कम लुटून नेली. चोरांनी लोखंडी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर कुटुंबीयांना शस्त्रांचा धाक दाखवत चोरी केली. चोरटे सुमारे दीड तास घरामध्ये थांबून होते. या दरम्यान चोरट्यांना विरोध करणाऱ्या संतोष चिंतामणी या युवकाला चोरट्यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. संतोष याची चोरांशी झटापट झाली.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक संजय सानप, नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. विजय खंडागळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णा घायवट घटनेचा तपास करत आहेत.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोकनगर येथे आशिष दौंड यांच्या वस्तीवर मागील महिन्यात जबरी चोरीची घटना घडली होती. त्या घटनेची उकल होत नाही तोच ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
----------