Join us
Daily Top 2Weekly Top 5

नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 14:36 IST

लैंगिक शोषणातील आरोपींना पुन्हा पॅरोल न देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

CM Devendra Fadnavis On Nasrapur Case: पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र संतप्त झाला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि अशा गुन्हेगारांवर लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल न देण्याबाबत नवीन कायदा करण्याचे आदेश विधी व न्याय विभागाला दिले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी एक धक्कादायक निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले की, "लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांतील ८० ते ९० टक्के आरोपी हे आधीच त्याच गुन्ह्याखाली जेलमध्ये असतात, मात्र पॅरोलवर बाहेर आल्यावर ते पुन्हा तशाच प्रकारचे कृत्य करतात."

या गुन्हेगारांची ही साखळी तोडण्यासाठी २०१४ ते २०१९ या काळात राज्य सरकारने असा कठोर कायदा केला होता, जो पुढे न्यायालयाने रद्दबातल ठरवला होता. आता पुन्हा तसाच प्रभावी कायदा तयार करा, जेणेकरून नराधमांना कायद्याची कोणतीही पळवाट मिळणार नाही, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

नराधमाला भरचौकात फाशी द्यावी वाटते, पण...

नसरापूर घटनेतील संतापावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक झाले. "एका बापाच्या नात्याने आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मलाही वाटते की अशा नराधमाला भरचौकात फाशी द्यावी, पण लोकशाहीत आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी लागते," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पीडितेच्या वडिलांशी स्वतः दोनदा संवाद साधल्याचे सांगत त्यांनी खात्री दिली की, या नराधमाला मृत्यूदंडाचीच शिक्षा व्हावी यासाठी सरकार पूर्ण ताकद लावेल.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणार

या प्रकरणातील तपासाबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या माध्यमातून हा खटला फास्ट ट्रॅकवर नेला जाईल. तसेच वेळेत चार्जशीट दाखल करून आरोपीला कोणतीही संधी दिली जाणार नाही. यासोबत कायद्याचा कोणताही दुरुपयोग होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

नेमकी घटना काय?

भोर तालुक्यातील नसरापूर येथे १ मे रोजी ही संतापजनक घटना उघडकीस आली. ६५ वर्षीय भीमराव कांबळे याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली होती. धक्कादायक म्हणजे, या आरोपीवर आधीही विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल होते. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याच्यावर हत्या, बलात्कार आणि पोक्सो कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर पुणे-बंगळुरू महामार्गावर ग्रामस्थांनी मोठे आंदोलन केले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nasrapur Murder: No Parole for Sex Offenders; CM Fadnavis Orders Stricter Law

Web Summary : Following the Nasrapur murder case, CM Fadnavis ordered a new law denying parole to sex offenders. He noted repeat offenses by those on parole. The government aims to create an effective law to prevent loopholes for such criminals.
टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकारपोलिसन्यायालय