पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झालेल्या भेटीबाबत पत्रकारांनी विचारले असता थोरात म्हणाले, राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे. हे प्रश्न केंद्र सरकारने सोडवले पाहिजेत. त्यात त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. केंद्रीय कृषीविषयक कायदे आहेत. आठ महिने झाले आंदोलन सुरू आहे. मला वाटले पवार साहेब त्या विषयीदेखील बोलले असतील. बँकिंग, सहकारी बँकिंग क्षेत्रात खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेषतः रिझर्व्ह बँकेची पूर्ण बंधने आता सहकारी बँकिंगवर येऊ घातली आहेत. तसे झाले तर बँकिंगमधील सहकार संपेल. ही वस्तुस्थिती आहे. मग आपल्या जिल्हा सहकारी बँका असो किंवा अर्बन बँका असो, या बँका पूर्णपणे रिझर्व्ह बँक ताब्यात घेत आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सोडविण्यासाठी पंतप्रधानांना भेटले पाहिजे.
मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोकराव चव्हाण यांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. आता पवार साहेबांनी भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे हे साहजिक आहे.