जिल्हा बँकेने सुरक्षा वाढवावी

By Admin | Updated: March 1, 2016 23:32 IST2016-03-01T23:30:36+5:302016-03-01T23:32:59+5:30

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांवर दरोडे पडण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत.

Increase security by district bank | जिल्हा बँकेने सुरक्षा वाढवावी

जिल्हा बँकेने सुरक्षा वाढवावी

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांवर दरोडे पडण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. वाढलेल्या घटना रोखण्यासाठी जिल्हा बँक उपाययोजना करणार की नाही, असा सवाल नाशिक विभाग शिक्षक लोकशाही आघाडी अध्यक्ष हिरालाल पगडाल यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा बँकेने ठेवीदार, खातेदार यांना सुरक्षा आणि सुविधा द्याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
जिल्हा बँकेच्या शाखांवर पडणाऱ्या दरोड्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पगडाल यांनी पत्रकाद्वारे हे मत नोंदविले आहे. ग्रामीण भागात जिल्हा बँकेच्या शाखांच्या इमारती असुरक्षित आहेत.
त्यांच्या इमारतीची दूरवस्था झालेली असून या शाखा सुरक्षित ठिकाणी सर्व सोयीयुक्त ठिकाणी हलवल्या पाहिजे. बँकेने अद्याप कोअर बँकिंग सुविधा, एटीएम सुविधा सुरू केलेली नाही. बँकेला स्वत: चा आयएफएसई कोड नाही. पुरेसे मनुष्यबळ नाही. शाखांमध्ये ग्राहकांसाठी वेटींग पिरिएड काळात पुरेशी बैठक व्यवस्था नाही. पंखे, स्वच्छतागृह नाहीत. कमी कर्मचारी वर्गावर कामाचा अधिक ताण असल्याने ते तणावग्रस्त मनस्थितीत असतात. ग्राहक व ठेवीदार यांना सौजन्यपूर्ण सेवा मिळत नाही, असे आरोप पगडाल यांनी उपस्थित केले आहेत.
बँकेचे संचालक निवडणुकीत जेवढे दक्ष असतात तेवढे कारभाराबाबत दक्ष असल्याचे दिसत नाहीत. बँक व्यवस्थापनाची खरेदी- विक्री सोसायट्या, साखर कारखाने, दूध संघ व दूध सोसायट्यांवर मेहेरनजर आहे. दुसरीकडे पगारदार नोकरांच्या पतसंस्था, प्राथमिक शिक्षक पेन्शन, ग्रामीण भागातील वीजबिल वसुली, माध्यमिक शिक्षकांचे पगार याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. बँकेने आता अन्य बँकांच्या तुलनेत स्पर्धात्मक सेवासुविधा दिल्या नाहीत तर लवकरच बँकेला ओहोटी लागेल, अशी शंका पगडाल यांनी व्यक्त केली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Increase security by district bank