मी कारवाईला येतोय, वाहने घेऊन पसार व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST2021-08-13T04:25:57+5:302021-08-13T04:25:57+5:30

नेवासा : पोलीस ठाण्यातून मी कारवाईला येतोय, जेवढी वाहने काढून निघून जाता येईल तेवढी घेऊन जा. मी जोपर्यंत सांगत ...

I'm coming to action, take the vehicles and pass | मी कारवाईला येतोय, वाहने घेऊन पसार व्हा

मी कारवाईला येतोय, वाहने घेऊन पसार व्हा

नेवासा : पोलीस ठाण्यातून मी कारवाईला येतोय, जेवढी वाहने काढून निघून जाता येईल तेवढी घेऊन जा. मी जोपर्यंत सांगत नाही तापर्यंत सर्व बंद, अशा आशयाची एक पोलीस अधिकारी व अवैध व्यावसायिक यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप गुरुवारी नेवासा तालुक्यात व्हायरल झाली.

‘त्या’ क्लिपमध्ये एक पोलीस अधिकारी समोरच्या व्यक्तीला ‘तुम्ही पिंपळगावमध्ये उच्छाद मांडला असल्याने सगळ्यांचे धंदे कायमस्वरूपी बंद करा. मी पोलीस स्टेशनमधून पिंपळगाव येथे येण्यासाठी निघालो आहे. मी तिथे येण्याआधी जेवढी वाहने काढून घेऊन जाता येतील तेवढी काढून घ्या, नाही तर जेवढी वाहने मिळतील तेवढी जप्त करण्यात येतील. येथून पुढे माझा आदेश येईपर्यंत तुमचे काम बंद राहील’, अशा आशयाच्या संभाषणाची क्लिप नेवासा तालुक्याती फेसबुक, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल होत आहे.

ही क्लिप कोणी व्हायरल केली? ही वाहने कसली होती? समोरील बोलणारी व्यक्ती कोण? आणि हा पोलीस अधिकारी नेमका कोण? याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक विजय करे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीचे संजय सुखधान यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

ऑक्टोबर महिन्यात नेवासा पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल गर्जे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर दत्ताराम राठोड यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

----

नेवासा पोलीस ठाण्यांतर्गत अवैध वाळू उपसा पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे वाळू तस्कर किंवा त्यांचे हस्तक अथवा राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या एखाद्या व्यक्तीद्वारे अशाप्रकारची बनावट क्लिप तयार करून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

-विजय करे,

पोलीस निरीक्षक, नेवासा

----

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा..

नेवासा तालुक्यातील अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी. तसेच चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी नेवासा तालुका भाजपच्यावतीने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, शहराध्यक्ष मनोज पारखे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे उपस्थित होते.

Web Title: I'm coming to action, take the vehicles and pass