जामखेड, सोलापूर रस्त्यावर आठ किलोमीटरची रांग

By Admin | Updated: September 24, 2016 00:10 IST2016-09-24T00:05:14+5:302016-09-24T00:10:54+5:30

अहमदनगर : एरवी वाहनांनी भरभरून वाहणारा सोलापूर, जामखेड रस्ता शुक्रवारी फक्त भगवेमय झाला होता

The eight-kilometer range on Jamkhed, Solapur road | जामखेड, सोलापूर रस्त्यावर आठ किलोमीटरची रांग

जामखेड, सोलापूर रस्त्यावर आठ किलोमीटरची रांग

अहमदनगर : एरवी वाहनांनी भरभरून वाहणारा सोलापूर, जामखेड रस्ता शुक्रवारी फक्त भगवेमय झाला होता. चांदणी चौकापासून ते थेट वाळुंज बायपास, तसेच जामखेड रस्त्यावर सारोळा बद्धीपर्यंत असा प्रत्येकी आठ किलोमीटर फक्त मराठा समाजाचा पूर ओसंडून वाहत होता. सकाळी सहापासून या रस्त्यांवर मोर्चेकरी येण्यास सुरूवात झाली, ती रांग दुपारी एकपर्यंत सुरू होती. मोर्चा संपला तरी काही लोक येतच होते. त्यामुळे त्यांना अर्ध्यातूनच मागे फिरावे लागले.
मोर्चाचे नियोजन गावागावात दोन दिवसांपासूनच सुरू होते. शुक्रवारी सकाळीही पहाटपासूनच अनेक गावांत फेरी मारून मराठा समाजाच्या लोकांना मोर्चास येण्याचे आवाहन करण्यात येत होते. लगीनघाई असल्यासारखी लोकांची सकाळीच आवरून निघण्याची घाई दिसत होती. सोलापूर नाक्यावर ड्रॉपपॉइंट होता. परंतु चारचाकी, दुचाकींची पार्किंग सोलापूर रस्त्यावर तुक्कडओढा येथे होती. त्यामुळे मोर्चेकरी तेथून पायी निघाले. चांदणी चौकापर्यंतचे हे अंतर सुमारे सात ते आठ किलोमीटरचे आहे. हातात भगवे ध्वज, डोक्यात ‘मी मराठा’ची गांधी टोपी, निषेधाचे काळे कपडे, तसेच काहींच्या दंडाला निषेधाची काळी पट्टी अशा पेहरावात ही पायी दिंडी वाडिया पार्ककडे सकाळपासून सुरू होती. दरेवाडी, वाकोडी, तुक्कडओढा अशा जवळच्या गावांतील विद्यालयांच्या विद्यार्थिनींच्या रॅली मोर्चात पुढे होत्या. त्यापाठोपाठ महिलांचा जथ्था होता. मजल दरमजल करत हे मोर्चेकरी नगरकडे निघाले. सोलापूर नाक्याच्या पुढे आल्यावर कोंबडीवाला मळा, सारसनगर पूल मार्गे ते वाडिया पार्क मैदानावर पोहोचत होते. जेव्हा वाडियापार्क फुल्ल झाले त्यानंतर मग हे सर्वजण चांदणी चौकाकडे आले.
सर्वत्र राष्ट्रीय बँका सुरू असल्या तरी शहरातील स्टेट बँकेची मुख्य शाखा शुक्रवारी बंद होती. मुख्य मोर्चा मार्ग बँक परिसरातच असल्याने बँक बंद ठेवण्यात आली. त्याचबरोबर एमआयआरसी परिसरात काही भागात लष्करी जवानांनी मोर्चेकऱ्यांना मदत केली. रेल्वेस्थानकाकडे जाणारे सैनिक मार्ग बदलून जात होते.

Web Title: The eight-kilometer range on Jamkhed, Solapur road