'घराखाली धन आहे' सांगून घर पाडायला लावले; अघोरीबाबाने सोन्याच्या आमिषाने जागेवरच ठोकला ताबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 20:49 IST2026-05-13T20:48:24+5:302026-05-13T20:49:49+5:30
नगरमध्ये अघोरीबाबाचा प्रताप, सोन्यासाठी पाडले घर; पोलिसांत तक्रार दाखल

'घराखाली धन आहे' सांगून घर पाडायला लावले; अघोरीबाबाने सोन्याच्या आमिषाने जागेवरच ठोकला ताबा
Ahilyanagar Crime: नाशिक येथील भोंदू खरातचे प्रकरण ताजे असतानाच नगरमध्ये अघोरीबाबाचा प्रताप समोर आला आहे. सोन्याचे आमिष दाखवत घर पाडण्यास सांगून घराच्या जागेवर बाबाने ताबा मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत एका तरुणाने मंगळवारी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. दरम्यान मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी अघोरी बाबासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महेश भास्कर काळोखे यांनी पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्याकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार राहत असलेल्या सर्जेपुरा परिसरात शिव अण्णासाहेब सोनवणे राहतो. तो स्वतःला अघोरीबाबा समजतो. जादूटोणा करून तो परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरवितो. घराखाली धन व सोने गाडलेले आहे, असे खोटून सांगून त्याने घर पाडण्यास भाग पाडले. त्याच्या सांगण्यानुसार तक्रारदार यांनी फेब्रुवारी महिन्यात घर पाडले. मात्र घराखाली कोणतेही धन अथवा सोने आढळून आले नाही. त्यानंतर पूजा, अघोरीविधी व तथाकथित उपाय करण्यासाठी त्याने तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपये उकळले. तक्रारदार यांनी पैसे परत मागितले असता बाबाने त्यांना धमकावले. तुझे घर पाडले आहे, ती जागा आता माझी आहे. तसेच अघोरी प्रयोग करून तुला संपवून टाकीन, अशी धमकी दिली. त्यामुळे शिव सोनवणे याच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार काळोखे यांनी केली आहे.
जागेसाठी मारहाण केल्याने चार जणांवर गुन्हा
दरम्यान महेश काळोखे यांनी याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिव अण्णासाहेब सोनवणे, ओम अण्णासाहेब सोनवणे, कोहिनूर अण्णासाहेब सोनवणे, यश सागर सोळशे अशा चार जणांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी पाडलेल्या घराची जागा विकत दे, असे म्हणत फिर्यादी व त्यांच्या आईला मारहाण केली. जमीन विकत दिली नाही, तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही आरोपीने दिली आहे.