रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट! १९९५ मध्येच राज-उद्धव ठाकरेंमध्ये मतभेद? कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 03:13 PM2022-07-23T15:13:51+5:302022-07-23T15:17:52+5:30

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली, शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते रामदास कदमही गेले आहेत. त्यानंतर आता कदम यांनी उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

रामदास कदम म्हणाले की, बाळासाहेबांनी मला खूप दिले, शाखाप्रमुखांपासून आमदार बनवले. परंतु १९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर साहेबांच्या मनात असतानाही मला मंत्रिपद का भेटले नाही हे उद्धव ठाकरेंना विचारा. बाळासाहेबांचे सेवक थापाला विचारा

बाळासाहेबांनी मला स्वत: यादी दाखवत म्हणाले हे तुझं नाव आहे. पण माझ्या घरात तुला घेऊ नका म्हणून भांडणं सुरू आहेत. माँ तुझ्याबाजूने आहे. रामदासला शब्द दिला मग मंत्री का बनवत नाही असं माँ साहेबांनी विचारलं याचे साक्षीदार धारावीचे तत्कालीन आमदार बाबूराव होते असं रामदास कदमांनी सांगितले.

मी राज ठाकरेंसोबत होतो म्हणून मला डावलण्यात आले. बाळासाहेब, माँसाहेब तयार होत्या. माझ्यासाठी घरात भांडणं होत असतील तर मी थांबतो असं मी बाळासाहेबांना सांगितले. २०१४ मध्ये जे खाते नव्हते तसं खाते विरोधी पक्षनेते असलेल्या माणसाला दिले.

प्रदूषण महामंडळ न देण्याबाबत चिडून देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनमध्ये गेलो तेव्हाही उद्धव ठाकरेंनी फोन करून फडणवीसांना रामदास कदमांना महामंडळ देऊ नये असं सांगितले. पक्षप्रमुख आहे काहीच बोलायचं नाही ही शिस्त आमच्या पक्षात आहे. म्हणून आम्ही काहीच बोललो नाही.

माझे आणि राज ठाकरेंचे खूप जवळचे संबंध होते. ज्यावेळी राज ठाकरे निघाले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. ते पुण्यात गेले. शेवटच्या क्षणापर्यंत मी आणि बाळा नांदगावकर राज ठाकरेंसोबत होतो, आम्ही जवळचे मित्र होतो असं सांगितले.

तसेच राज यांना थांबवण्यासाठी मी मातोश्रीला गेलो, उद्धव ठाकरेंना आम्ही विचारले राज यांना थांबवण्याचा एकदा प्रयत्न करू का? ते हो म्हणाले. परंतु हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यावेळी मी राज ठाकरेंच्या जवळ होतो म्हणून उद्धव ठाकरेंच्या मनात खटकत होतं का? असा प्रश्न आजही माझ्या मनात आहे असं कदमांनी सांगितले.

मोठे साहेब भाजपाला कमळाबाई म्हणायची, भाजपावर तुटेपर्यंत कधी टीका बाळासाहेबांनी केली नाही. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना सांगितले होते, मला मुख्यमंत्री करणार असाल तर मातोश्रीवर या त्यामुळे चुकीची माहिती लोकांसमोर नका आणू. महाविकास आघाडीचं नाटक कसं झाले ते राऊतांना विचारा असंही रामदास कदमांनी सांगितले.

कदमांच्या या विधानानंतर राज ठाकरेंनी १६ वर्षांपूर्वी, २७ नोव्हेंबर २००५ रोजी शिवसेना सोडताना भाषण केले होते ते पुन्हा चर्चेत आले आहे. "शिवसेना संपवायला निघालेल्या चार कारकुनांच्या कंपूच्या पापात वापल्याला वाटेकरी व्हायचं नाही. शिवसेना प्रमुखच आपले दैवत आहे. मात्र या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं असून त्यांच्यासोबत आपल्याला काम करायची इच्छा नाही असं त्यांनी सांगितले होते.

त्याचसोबत काही दीडदमडीच्या लोकांना राजकारण समजत नाही, असे लोक आता शिवसेना चालवत आहेत. शिवसेनेसाठी आपण सर्वस्व दिलं पण आपल्या वाट्याला वाईट वागणूक आली, माझ्याशी संबंध असणाऱ्यांना डावललं गेले, तिकीट कापले गेले असा आरोप राज ठाकरेंनी शिवसेना सोडताना केला होता.