एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 03:59 AM2024-04-30T03:59:19+5:302024-04-30T03:59:50+5:30

पंतप्रधान मोदी यांच्या सोमवारी राज्यात सोलापूर, कऱ्हाड आणि पुणे येथे जाहीर सभा झाल्या. या तीनही ठिकाणी त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीकास्त्र सोडले. 

lok sabha election 2024 Fake videos by AI Conspiracy to cause an accident pm Narendra Modi will attack the opposition | एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल

एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल

पुणे, कऱ्हाड, सोलापूर : आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून भाजपच्या अनेक नेत्यांच्या आवाजात फेक व्हिडीओ तयार करण्याचे काम सुरू आहे. शांततेत निवडणुका होऊ नयेत, यासाठी येत्या महिनाभरात देशात काहीतरी अघटित घटना घडविण्याचा विरोधकांचा डाव आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही आणि धर्माच्या नावावर आरक्षण आणण्याचा प्रयत्न करू देणार नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. शरद पवार यांना लक्ष्य करीत ‘भटकती आत्मा’ अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली.

 पंतप्रधान मोदी यांच्या सोमवारी राज्यात सोलापूर, कऱ्हाड आणि पुणे येथे जाहीर सभा झाल्या. या तीनही ठिकाणी त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीकास्त्र सोडले.  कऱ्हाड येथे मोदी म्हणाले, या देशामध्ये काँग्रेसने प्रदीर्घ काळ राज्य केले. परंतु, भारतीय सैनिकांना ‘’वन रँक वन पेन्शन’’पासून वंचित ठेवले. पण, आम्ही तो शब्द दिला होता तो पूर्ण करून दाखविला. ही मोदींची गॅरंटी आहे.

छत्रपती शिवरायांच्या कार्याचा जाज्वल्य इतिहास आहे. म्हणून तर देशातील अनेक ऐतिहासिक किल्ले हे जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट व्हावेत, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. नौदलाच्या झेंड्यावर शिवाजी महाराजांच्या मुद्रेला स्थान दिले, असेही ते म्हणाले. मंगळवारी पंतप्रधान माेदी यांच्या माळशिरस, लातूर व धाराशिव येथे सभा हाेतील.

काँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात एससी, एसटी अन् ओबीसींवर सर्वाधिक अन्याय; आम्ही सुविधा दिल्या

काँग्रेसने आपल्या ६० वर्षांच्या काळात अनुसूचित जाती, जमाती, ओबीसींचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. या काळात या समाजावर सर्वाधिक अन्याय झाला, असा आरोप मोदी यांनी सोलापुरात बोलताना केला.

n३१ मिनिटांच्या भाषणात माेदी म्हणाले, आमच्या सरकारच्या १० वर्षांच्या काळात ओबीसींना वैद्यकीय प्रवेशात आरक्षण लागू केले. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला. आरक्षणाची मर्यादा दर दहा वर्षांनी वाढवावी लागते. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आमच्या काळातही ही मर्यादा दहा वर्षांनी वाढविण्यात आली.

काँग्रेसने ६० वर्षांत जे केले नाही ते मागील १० वर्षांत आम्ही केले; देश आत्मनिर्भर केला

पुण्यात बोलताना मोदी म्हणाले, की संविधानाचा खरा अपमान काँग्रेसच करत आहे. कर्नाटकात त्यांनी एका रात्रीत सर्व मुस्लिमांना ओबीसी केले. त्यामुळे मूळ ओबीसींच्या आरक्षणावर टाच आली. संविधानात कुठेही धर्माच्या आधारावर आरक्षण द्या, असे म्हटलेले नाही.’

काँग्रेसने ६० वर्षांत जे केले नाही ते मागील १० वर्षांत आम्ही केले. आम्ही देश आत्मनिर्भर केला. देश आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे. संरक्षण साधनांच्या उत्पादनात आपण आत्मनिर्भर झालो. देशात सव्वालाख स्टार्टअप सुरू झाले. इंग्रजांनी केलेले कायदे आहे तसेच सुरू होते, ते आम्ही बदलले. देश विकासाच्या वाटेवर वेगात चालला आहे.

शरद पवारांचे नाव न घेता म्हणाले, ‘भटकती आत्मा’

‘महाराष्ट्रातील एका नेत्याने ३५ वर्षांपूर्वी राज्यात सत्ताबदल केला. तेव्हापासून राज्यात एकही मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्व करू शकला नाही. याच नेत्याने सन १९९५ लाही युतीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मोदी यांनी केला. त्यांनी शरद पवार यांचे नाव घेतले नाही, मात्र रोख त्यांच्याकडेच होता. ७० वर्षांवरील सर्व व्यक्तींचे वैद्यकीय उपचार विनामूल्य केले जातील, असे आश्वासनही दिले.

‘वाे ताे कहीं फाेन करके पूछेंगे की खबर छापे की नही छापे...’

काँग्रेस सरकार आणि गेल्या दहा वर्षांमधील आपल्या सरकारच्या प्रगतीविषयी बोलताना माेदी यांनी  मनमोहन सिंग सरकारवर सडकून टीका केली.

काँग्रेस सरकारने दहा वर्षांत पायाभूत सुविधांवर केलेला खर्च आम्ही केवळ एका वर्षात केला. ही वस्तुस्थिती आपल्याला लोकांना सांगावी लागेल. मात्र, ही बातमी उद्या वर्तमानपत्रे छापणार नाहीत.

‘वाे ताे कहीं फाेन करके पूछेंगे की खबर छापे की नही छापे... यही है ना हाल यहाॅंपर’ असे ते पुण्यातील सभेत म्हणत त्यांनी दहा वर्षांत केलेल्या कामगिरीचा पाढा वाचला.

Web Title: lok sabha election 2024 Fake videos by AI Conspiracy to cause an accident pm Narendra Modi will attack the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.