वणी, पांढरकवड्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 05:00 AM2021-09-22T05:00:00+5:302021-09-22T05:00:11+5:30

सोमवारी दुपारी वणी तालुक्यात वणी, मारेगाव व झरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा पाऊस बरसला. त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली. मात्र ११ वाजतानंतर पुन्हा धुव्वादार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस दुपारी १२ वाजेपर्यंत सुरूच होता. त्यानंतर मात्र पावसाने ब्रेक दिला. या मुसळधार पावसामुळे वणी उपविभागातील वाहणाऱ्या विदर्भा, निर्गुडा, वर्धा या नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली.

Wani, Pandharkavadya was hit by rain | वणी, पांढरकवड्याला पावसाने झोडपले

वणी, पांढरकवड्याला पावसाने झोडपले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी उपविभागात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी दुपारपर्यंत अक्षरश: थैमान घातले. या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला. शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरले. कापणीवर आलेले सोयाबीन व वेचणीवर आलेला कापूस या पावसाने मातीमोल केला. मंगळवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगांनी आभाळ दाटून होते. २४ तासात वणी तालुक्यात ८५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दुपारी वणी तालुक्यात वणी, मारेगाव व झरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा पाऊस बरसला. त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली. मात्र ११ वाजतानंतर पुन्हा धुव्वादार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस दुपारी १२ वाजेपर्यंत सुरूच होता. त्यानंतर मात्र पावसाने ब्रेक दिला. या मुसळधार पावसामुळे वणी उपविभागातील वाहणाऱ्या विदर्भा, निर्गुडा, वर्धा या नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. २४ तासात वणी तालुक्यात ८५ मीमी पाऊस कोसळला. झरी तालुक्यात २६ मिमी, तर मारेगाव तालुक्यात १६ मिमी पाऊस कोसळला. 
बॉक्स : अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प
विदर्भा नदीला पूर आल्यामुळे कायरलगतच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला. वणीलगतच्या वागदरा व कवडशी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता पूर्णत: बंद झाला होता. वारगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने चारगाव ते वारगाव हा रस्ता पूर्णत: बंद झाला. विठ्ठलनगरमध्ये पाणी वाहत असल्याने याठिकाणचीही वाहतूक बंद होती. पेटूर पुलावरून दुपारपर्यंत पाणी वाहत होते. नांदेपेरा येथे नाल्याच्या पुरामुळे  नांदेपेरा, शेलू खु., भुरकी, रांगणा या गावांचा वणी शहराशी संपर्क तुटला होता. वणी-घोन्सा मार्गावरील वणीलगतच्या ड्रीम लँड सिटीजवळून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत वणी-घोन्सा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वणी-नांदेपेरा चौफुलीवरील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने हा मार्गदेखिल बंद झाला होता. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. 

अनेक घरात पाणी शिरले
- मुसळधार पावसामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वणी तालुक्यातील पठारपूर येथे गावालगतच्या शेतातील पावसाचे पाणी पाच ते सहा घरात शिरले. यासोबतच सावर्ला गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याचे पाणीदेखिल अनेक घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. घरातील साहित्य पावसात भिजले. 

सोयाबीनची गंजी गेली पुरात वाहून
- वणी तालुक्यातील रांगणा येथे गावालगत असलेल्या नाल्याला व वर्धा नदीला पूर आल्याने नाल्यालगत असलेल्या नवनाथ लोडे यांच्या शेतात कापणी करून ठेवलेली सोयाबीनची गंजीच पुरात वाहून गेली. त्यामुळे त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. यासोतच प्रकाश लोडे यांच्या शेतातील रासायनिक खत व बैलांचा चारा पुरात वाहून गेला. शिवशंकर कातकर यांचे कपाशीचे पीक पुरात वाहून गेले. 

गुंजचे मंदिर, अंगणवाडी पाण्यात
- वणी शहरालगत वरोरा मार्गावर असलेल्या गुंजच्या मारोती मंदिराचा परिसर संपूर्ण पाण्याने वेढला होता. या मंदिराजवळून वाहणाऱ्या नाल्याला मोठा पूर आल्याने पहिल्यांदाच या मंदिर परिसरात पाणी शिरले. वणी तालुक्यातील निळापूर येथील अंगणवाडीतही पाणी शिरले. या हंगामात पहिल्यांदाच या भागात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने शेतपिकांची मोठी हानी झाली आहे. 

निंबाळालगत शेतात वीज कोसळली
- मंगळवारी सकाळी काही काळ विजांचा कडकडाटही झाला. याचदरम्यान वणी-यवतमाळ मार्गावरील निंबाळा गावालगतच्या राजू आसेकर यांच्या शेतातील सागवानाच्या झाडावर वीज कोसळली. यामुळे गावाला मोठा हादरा बसला. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र परिसरात या घटनेने भीतीचे वातावरण आहे. 

 

Web Title: Wani, Pandharkavadya was hit by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.