बालरुग्ण वार्ड हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:08+5:30

तात्पुरत्या स्वरूपात मेडिकलच्या जुन्या इमारतीत बालरुग्ण विभागाचा वार्ड तयार झाला आहे. या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नाही. केवळ ४४ बेड उपलब्ध आहेत. स्वीपर, अटेडन्स, स्टाफ नर्स यांचीही संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने आलेल्या रुग्णांची सुश्रुषा करताना अनेक समस्या येत आहेत.

Pediatric ward housefull | बालरुग्ण वार्ड हाऊसफुल्ल

बालरुग्ण वार्ड हाऊसफुल्ल

Next
ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालय : क्षमता ४४ बेडची, प्रत्यक्ष दाखल झालेत शंभरावर बालरुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरुग्ण विभागात अद्ययावत अतिदक्षता उपचार कक्ष तयार केला जात आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात वार्ड तयार करण्यात आला. त्या ठिकाणी उपलब्ध क्षमतेच्या दुप्पटीपेक्षा अधिक रुग्ण आहेत. एका बेडवर तीन-तीन बालक उपचार घेत आहे. अनेक समस्या या वार्डमध्ये निर्माण झाल्या आहेत.
तात्पुरत्या स्वरूपात मेडिकलच्या जुन्या इमारतीत बालरुग्ण विभागाचा वार्ड तयार झाला आहे. या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नाही. केवळ ४४ बेड उपलब्ध आहेत. स्वीपर, अटेडन्स, स्टाफ नर्स यांचीही संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने आलेल्या रुग्णांची सुश्रुषा करताना अनेक समस्या येत आहेत. शिवाय लिफ्ट लावलेली असूनही कार्यान्वित करण्यात आली नाही. त्यामुळे वार्डात लागणारी औषधी व इतर साहित्य पायऱ्यांवरूनच आणावे लागत आहे. अनेकदा तर रुग्णांच्या नातेवाईकांच्या डोक्यावरच औषधांचे खोके द्यावे लागते. शिवाय आजारी मुलांना घेऊन कुठल्याही तपासणीसाठी अपघात कक्षाजवळच्या एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त तपासणीसाठी चकरा माराव्या लागतात. अनेकदा मुलांच्या माता-पित्यांना लहान मुलांना घेऊन ताटकळत बसून रहावे लागते. रविवारी रात्री ८ वाजता योगीता राठोड रा. चाणी ता. दारव्हा या मुलीला घेऊन तिचे वडील एक्स-रेसाठी बसून होते. तब्बल चार तास वाट पाहिल्यानंतरही तंत्रज्ञ त्या विभागात फिरकलाच नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

संसर्गाचा धोका वाढला
उपचारासाठी आलेल्या मुलांची प्रकृती सुधारण्याऐवजी वार्डात दाखल झाल्यानंतर आणखी गंभीर होत आहे. मुलांना वार्डात आल्यानंतर गर्दीमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. शिवाय टीबी सारखा संसर्गजन्य वार्ड बालरुग्ण विभागाच्या वार्डाला लागून आहे. यामुळे संसर्गाचा धोका आणखीच निर्माण झाला आहे. अनेक बालक उपचार घेऊन घरी गेल्यानंतर पुन्हा-पुन्हा आजारी पडत आहे.
ट्रान्सफार्मर जळाल्याने वीज गूल
मेडिकल परिसरातील ट्रान्सफार्मर जळाल्याने सोमवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. व्हेन्टीलेटरवर असलेल्या रुग्णांना चक्क अम्बू बॅगच्या सहाय्याने कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न करावा लागला. सकाळी ७ वाजता बंद झालेला वीज पुरवठा दुपारी १२ नंतरच सुरळीत झाला. यामुळे अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर जीवरक्षक प्रणाली कार्यान्वित ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.

मेडिकलचे सर्वच वार्ड हाऊसफुल्ल झाले आहे. क्षमतेपेक्षा किती तरी अधिक रुग्ण येत आहे. बाह्यरुग्ण तपासणी २६२७ रुग्ण आले. या पैकी २५० रुग्ण भरती होतात. फवारणी विषबाधा रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. एका दिवशी १७ रुग्ण दाखल झाले. मर्यादित साधने व मनुष्यबळावर आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

जुन्या इमारतीत लिफ्ट लावली आहे. मात्र आर्किटेक विभाग मुंबई यांच्याकडून प्रमाणपत्र आले नसल्याने लिफ्टचा वापर करता येत नाही. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- रिता बोकडे
अभियंता, विद्युत विभाग.

Web Title: Pediatric ward housefull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.