मजूर म्हणतात, गाव हे फुलांचे होते, का बकाल झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 06:00 AM2020-10-20T06:00:00+5:302020-10-20T06:00:09+5:30

Yawatmal News १९९५ सालचा तो काळ. तेव्हा यवतमाळची स्मशानभूमी म्हणजे हिरवीकंच छान भूमी बनली होती. विठ्ठल हुशन्ना सुरावार या माणसाने आपल्या २५ मजुरांसह स्मशानाचा बगीचा फुलविण्याचे शिवधनुष्य पेलले.

The laborer says, the village was full of flowers, why it was empty! | मजूर म्हणतात, गाव हे फुलांचे होते, का बकाल झाले!

मजूर म्हणतात, गाव हे फुलांचे होते, का बकाल झाले!

Next
ठळक मुद्देबगीचा सजविणाऱ्या कष्टकऱ्यांच्या मनात दाटली खंतजगविलेली झाडे झाली मरणासन्न

अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मूल जन्माला येते तेव्हा ते गोड दिसते, त्याचे कौडकौतुक होते. पण मोठे होताना संगत चुकली तर हेच गोड लेकरू समाजाच्या तिरस्काराचे कारण बनते... यवतमाळातील बगीच्यांची अवस्था नेमकी तशीच झाली आहे. सौंदर्य विद्रूप झाले. पण हे बगीचे ज्या मजुरांनी स्वत:च्या हाताने सजविले, वाढविले, त्यांच्या दु:खाला तर पारवारच नाही. ते म्हणतात, वाळलेली झाडं पाहून पोटची पोरं उपाशी असल्यासारखे वाटते...
एक हीच शंका माझी
अजूनही फिटेना
गाव हे फुलांचे होते
का बकाल झाले
सुरेश भटांच्या या गझलेसारखाच आज सर्वसामान्य यवतमाळकरांच्या मनालाही प्रश्न पडला आहे.
१९९५ सालचा तो काळ. तेव्हा यवतमाळची स्मशानभूमी म्हणजे हिरवीकंच छान भूमी बनली होती. विठ्ठल हुशन्ना सुरावार या माणसाने आपल्या २५ मजुरांसह स्मशानाचा बगीचा फुलविण्याचे शिवधनुष्य पेलले. नियोजन आणि कष्ट यांच्या संगमाने स्मशानभूमी एवढी देखणी झाली की, लोक येथे डबापाटीर्साठी येऊ लागले. शिक्षक शाळेच्या विद्यार्थ्यांची छोटी सहल येथे आणू लागले. यवतमाळच्या देखण्या स्मशानाची कीर्ती संपूर्ण जिल्हाभर पसरली. याच काळात गोधनी मार्गावरील नेहरू मंच, नगरभवनपुढील गार्डन, शिवाजी बाल उद्यान, नेहरू बाल उद्यान हे बगीचेही सुरावार आणि त्यांच्या मजुरांनी फुलविले, प्रसिद्ध केले.

या बगीच्यांनी यवतमाळच्या वैभवाला हिरवी श्रीमंती दिली. पण कालांतराने हे मजूरही दुर्लक्षित झाले अन् बगीचेही अडगळीत पडले. प्रशासनाने, पदाधिकाऱ्यांनी अनास्था दाखविल्यामुळे आज हे बगीचे बेजान बनले आहेत. साहजिकच आता तिकडे कुणीही फिरकत नाही. सब फुलो के हैं दिवाने.. काटो से दिल कौन लगाये.. अशी या बगीच्यांची अवस्था आहे. झाडं सुकली, झुकली, मेली. त्यांना जगविणारे मजूरही आज कामं शोधत आहेत. पण त्यांच्यावर कुणाचीच नजर नाही गेली. सुरावार यांच्या आश्रयाला राहून राबणारे हे मजूर लॉकडाऊनच्या काळात तर रोजगाराला अगदीच मोताद झाले आहेत. नगरपालिकेने पुन्हा बगीच्यांना फुलवावे आणि मजुरांनाही रोजगार द्यावा, अशी अपेक्षा आहे.

रखरखीत जमिनीला हिरवेगार करण्याची क्षमता मजुरांमध्ये आहे. मात्र वाळवंट बनत चाललेल्या बगीच्यांना वाचविण्याची इच्छाशक्ती राजकीय नेतृत्वामध्ये आहे का हा प्रश्न आहे. उत्तर सकारात्मक असेल तरच हिरवाई टिकेल.

सहा लाख झाडांची पुण्याई
रोजगार म्हणून बाग फुलविणाऱ्या विठ्ठल सुरावार यांनी झाडांना पोरासारखे जपले. आजवर सहा लाखांवर झाडे लावली. या झाडांचीच पुण्याई म्हणून आज माझी मुले एलएलबी, इंजिनिअरिंगसारखे शिक्षण घेऊ शकले, अशी कृतज्ञता सुरावार यांनी व्यक्त केली.

 

Web Title: The laborer says, the village was full of flowers, why it was empty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.