नगरपरिषदेत सर्वसाधारण सभेचा धडाका

By Admin | Updated: September 7, 2014 00:12 IST2014-09-07T00:12:24+5:302014-09-07T00:12:24+5:30

नगरपरिषदेत सत्ताबदल झाल्यापासून सर्वसाधारण सभेचा धडाका सुरू आहे. आॅगस्ट महिन्यात तीन सर्वसाधारण सभा घेण्यात आल्या. आता सप्टेंबरच्या सुरुवातीलाच शनिवारी सर्वसाधारण सभा झाली.

General meeting rally in the municipal council | नगरपरिषदेत सर्वसाधारण सभेचा धडाका

नगरपरिषदेत सर्वसाधारण सभेचा धडाका

यवतमाळ : नगरपरिषदेत सत्ताबदल झाल्यापासून सर्वसाधारण सभेचा धडाका सुरू आहे. आॅगस्ट महिन्यात तीन सर्वसाधारण सभा घेण्यात आल्या. आता सप्टेंबरच्या सुरुवातीलाच शनिवारी सर्वसाधारण सभा झाली. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही धडपड केली जात आहे.
नगरपरिषदेने अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी पॅच रिपेअरिंग व खडीकरणाची कामे मंजुरी केली आहे. तब्बल २५ लाख रुपये या कामांवर खर्च केले जाणार आहे. सदर कामाची झोननिहाय विभागनी करून त्यावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. झोन क्र.१ मध्ये सहा लाख, २ आणि ३ मध्ये प्रत्येकी साडेसात लाख, झोन क्र.४ मध्ये तीन लाख, यवतमाळ-पांढरकवडा राज्य मार्गाच्या उत्तर व दक्षिणेकडील भागात खडीकरणासाठी प्रत्येकी ७५ हजार रुपये मंजूर करण्यात आले. या शिवाय वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून हिंदू स्मशानभूमीत मुंडण विधी, मृत्यू नोंदणी कार्यालय, वस्ती संकलन केंद्र व स्मशानभूमी परिसर सौंदर्यीकरण यासाठी पाच वेळा ई-निविदा मागविण्यात आल्या. मात्र केवळ एकाच कंत्राटदाराने अंदाजपत्रकीय दरापेक्षा ९.९९ टक्के अतिरिक्त दराची निविदा दाखल केली. यावर काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. मात्र चर्चेअंती ५३ लाख ५३ हजार रुपयांच्या निविदा प्रस्तावाला मंजूर करण्यात आले. अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास योजनेतून मुस्लिम कब्रस्तानातील अंदाजपत्रकीय दरापेक्षा नऊ टक्के अधिक दरात असलेल्या १४ लाख १२ हजार रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. बाजोरियानगरातील खुल्या जागेसाठी संरक्षक भिंतीच्या बांधकाम निविदेला मंजुरी देण्यात आली.
या बैठकीला नगराध्यक्ष सुभाष राय, उपाध्यक्ष मनीष दुबे, मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांच्यासह सर्व समिती सभापती, नगरसेवक आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: General meeting rally in the municipal council