विस्तार अधिकारी पदोन्नतीत घोडेबाजार

By Admin | Updated: September 13, 2014 00:35 IST2014-09-13T00:35:08+5:302014-09-13T00:35:08+5:30

जिल्हा परिषद पंचायत विभागात गेल्या अनेक वर्षापासून पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती.

Expansion Officer Promotional Horse Market | विस्तार अधिकारी पदोन्नतीत घोडेबाजार

विस्तार अधिकारी पदोन्नतीत घोडेबाजार

यवतमाळ : जिल्हा परिषद पंचायत विभागात गेल्या अनेक वर्षापासून पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती. सेवाज्येष्ठता असलेल्यांना पदोन्नती मिळावी आणि रिक्त जागेवरची पदेही भरली जावी हा दुहेरी उद्देश ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पदोन्नती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले. मात्र काही संधी साधूंनी या पदोन्नतही घोडेबाजार करीत चक्क निकषांनाच बगल देण्याचा प्रयत्न चालविला आहे.
पंचायत विभागात २४ आॅगस्ट रोजी पदोन्नती पात्र ग्रामविकास अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीवर २६ आॅगस्ट रोजी आक्षेप घेण्याची मुदत देण्यात आली. दोन दिवसात ही यादी १६ पंचायत समितीमध्ये प्रसिद्धही होवू शकली नाही. बऱ्याच जणांना यादी आॅनलाईन असली तरी ती पाहताच आली नाही. किमान १५ दिवसाचा कालावधी आक्षेपासाठी देणे अपेक्षित होते. सेवाज्येष्ठतेनुसार लावलेली यादी निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्षात अंतिम यादी बिंदूनामावलीप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आली. एकाच पदोन्नतीच्या यादीला दोन निकष कसे काय लावले जातात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अपहार केलेल्यांनाही पदोन्नतीस पात्र ठरविण्यात आले. त्यासाठी बुधवारी वसुलपात्र रकमा संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांनी भरून दिल्या.
एका सचिवाने या पदोन्नती प्रक्रियेत स्वत:ची पोळी शेकण्यासाठी पंचायत विभागात ठिय्याच मांडला होता. किमान आठ जणांनी ५० हजार रुपये इतकी रक्कम मोजून लिपिकामार्फत आपली फिल्डींग लावली आहे. या प्रकारामुळे चांगल्या उद्देशाने राबविण्यात येत असलेली पदोन्नती प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने पदोन्नती मिळणे अपेक्षित होते ते वंचित राहिल्याने असंतोष व्यक्त केला जात आहे. या गैरप्रकाराबाबत जिल्हा परिषदेतील वरिष्ठ नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Expansion Officer Promotional Horse Market