दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रात्यक्षिक

By Admin | Updated: September 18, 2014 00:07 IST2014-09-18T00:07:43+5:302014-09-18T00:07:43+5:30

दहा वर्षांपूर्वीच्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन शिपायांमार्फत टायमर लावून प्रात्यक्षिक करवून घेतले. पोलीस आयुक्त थेट दत्त चौकातील एका कृषी केंद्रात चौकशीसाठी धडकले.

Demonstrate suspicious death of two youth | दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रात्यक्षिक

दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रात्यक्षिक

यवतमाळ : दहा वर्षांपूर्वीच्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन शिपायांमार्फत टायमर लावून प्रात्यक्षिक करवून घेतले. पोलीस आयुक्त थेट दत्त चौकातील एका कृषी केंद्रात चौकशीसाठी धडकले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह ही फेरचौकशी करीत आहेत. यात याचिकाकर्ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर व प्रकरणाशी संंबंधित ८८ जणांना यापूर्वीच साक्ष देण्यासाठी समन्स जारी करण्यात आले होते. त्यानुसार तत्कालीन शहर ठाणेदार अनंत थोरात, फौजदार सुधाकर अंभोरे यांच्यासह पोलीस खात्याबाहेरील साक्षीदारांची गेली दोन दिवस बयाणे नोंदविण्यात आली. बयाणे नोंदविताना आयुक्त राजेंद्रसिंह यांनी घटनेनंतर त्यावेळी स्थानिक पोलिसांनी आणि त्यानंतर सीआयडीने नोंदविलेली बयाणे साक्षीदारांना वाचून दाखविली. शिवाय त्यावेळी दिलेले जबाब बरोबर आहे का, त्यात काही सुधारणा करायची आहे का, असे विविध बारकावे तपासून त्यांनी फेरबयाणे घेतली. यापूर्वी झालेल्या पोलीस तपासात सुरेश सोनकुसरे आणि अजय मोहिते या दोन युवकांनी दत्त चौकातील एका कृषी केंद्रातून विषारी औषध खरेदी केले. तसेच तेथेच ते प्राशन करून दोघेही चालत पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आले. काही वेळाने स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयापुढे त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. दत्त चौकात विष प्राशन करून पाच मिनिटांत पायदळ पोहोचता येते का, याची खातरजमा करण्यासाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांकरवी प्रात्यक्षिक करवून घेतले. टायमरनुसार पोलीस शिपाई पाच मिनिटात अधीक्षक कार्यालयात पोहोचू शकले नाही. तपासात उणीवा राहू नये म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील चहा टपरीच्या जागेची त्यांनी बारकाईने पाहणी केली. त्यानंतर थेट दत्त चौकातील कृषी केंद्रात जाऊन चौकशी केल्याचे पोलिसातून सांगण्यात आले. आतापर्यंत चौकशीत ५० वर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले.
(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Demonstrate suspicious death of two youth