पाच मॉडेल कोर्टांमध्ये दारव्हाचा समावेश

By Admin | Updated: October 3, 2015 02:25 IST2015-10-03T02:25:25+5:302015-10-03T02:25:25+5:30

राज्यात पाच मॉडेल कोर्ट निर्माण करण्याचा निर्णय झाला होता.

Darwa's involvement in five-model courts | पाच मॉडेल कोर्टांमध्ये दारव्हाचा समावेश

पाच मॉडेल कोर्टांमध्ये दारव्हाचा समावेश

भूषण गवई : नवीन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन
दारव्हा : राज्यात पाच मॉडेल कोर्ट निर्माण करण्याचा निर्णय झाला होता. त्यामध्ये दारव्हा येथील न्यायालयाचा समावेश करण्यात आला. ही दारव्हा तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. भूषण गवई यांनी केले.
भूषण गवई यांच्या हस्ते दारव्हा येथील न्यायालयीन इमारतीचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप शिरासाव होते. व्यासपिठावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. रवी कृष्णराव देशपांडे, पालकमंत्री संजय राठोड, दारव्हा येथील जिल्हा न्यायाधीश - १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश कीर्तीकुमार सेदाणी, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड़ आशीष देशमुख, तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ शैलेश बल्लाळ, सचिव अ‍ॅड़ मनोज कावळे आदींची उपस्थिती होती.
न्या. भूषण गवई पुढे म्हणाले, सध्या येथे मॉडेल कोर्टची इमारत झाली. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा अद्याप पुरविण्यात आल्या नाही. केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होताच मॉडेल कोर्ट ही संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल.
राज्यातील पाच मॉडेल कोर्टमध्ये दारव्हाचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये याठिकाणी वकिलीचा व्यवसाय केलेले आणि सध्या मुंबई उच्च न्यायालयात रजिस्टार असलेले दारव्ह्याचे सुपूत्र राजेश लढ्ढ, अ‍ॅड़ आशीष देशमुख यांच्या नावाचा गवई यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. यावेळी बोलताना पालकमंत्री राठोड यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात न्यायव्यवस्था मोठा आधारस्तंभ आहे. चारही स्तंभामध्ये न्यायव्यवस्था मोठा स्तंभ असल्याचे ते म्हणाले. यावेळी इतर मान्यवरांचेही मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाला अ‍ॅड़ एस.बी. उके, अ‍ॅड़ एस.ए. कथले तसेच न्यायाधीश, वकील, कर्मचारी, दारव्हा वकील संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Darwa's involvement in five-model courts