पालिकेच्या कारभाराविषयी काँग्रेस नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:00 AM2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:07+5:30

अमृत योजनेंतर्गत पाईप लाईन टाकण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले. मागील दीड वर्षात खोदलेले रस्ते चार-सहा महिन्यांपूर्वी नवीन तयार केले गेले. अवघ्या काही महिन्यात या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामध्ये पाणी साचून राहात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

Congress Councilor Aggressive About Municipal Stewardship | पालिकेच्या कारभाराविषयी काँग्रेस नगरसेवक आक्रमक

पालिकेच्या कारभाराविषयी काँग्रेस नगरसेवक आक्रमक

Next
ठळक मुद्देगैरप्रकाराविरूद्ध आवाज : कागदोपत्री प्रकल्पावर दरमहा दीड लाख खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेच्या कारभाराविरूद्ध काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध गैरप्रकाराविषयी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सावरगड येथील गांडूळ खत प्रकल्प, शहरातील रस्त्यांची निकृष्ट कामे, निर्माणाधीन नाट्यगृहासाठी प्राप्त निधी आदींमध्ये सुरू असलेला गोंधळ तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
सावरगड येथे गांडूळ खत प्रकल्प सुरू असल्याचे नगरपरिषदेने दर्शविले आहे. मात्र या प्रकल्पातून आतापावेतो किती खत निर्मिती झाली, किती उत्पन्न झाले याची माहिती पालिकेकडून उपलब्ध करून दिली जात नाही. कचरा डेपोला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी २०१६ पर्यंतच होती. पुढील परवानगी नसताना कचरा डेपो सुरळीत सुरू असल्याचे दाखविले जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पावर दरमहा एक लाख ५० हजार रुपये एवढा खर्च दाखविला जात आहे. याविषयी सखोल चौकशीची मागणी काँग्रेस नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अमृत योजनेंतर्गत पाईप लाईन टाकण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले. मागील दीड वर्षात खोदलेले रस्ते चार-सहा महिन्यांपूर्वी नवीन तयार केले गेले. अवघ्या काही महिन्यात या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामध्ये पाणी साचून राहात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सदर कामे सदोष झाल्याचे स्पष्ट होते. गुणवत्ता नियंत्रण मंडळ किंवा तत्सम यंत्रणेकडून या कामाची तपासणी करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
सन २००३ पासून शहरात नाट्यगृहाचे बांधकाम सुरू आहे. विविध प्रकारचे बदल वेळोवेळी करून नवनवीन बाबी त्यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही काम पूर्णत्वास गेले नाही. छोट्या-छोट्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात अंदाजपत्रकांमध्ये निधीची तरतूद होऊनही कामे विहीत मुदतीत पूर्ण झालेली नाही. अशावेळी कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आलेली नाही. नवीन निविदा प्रक्रिया राबवून पैशांचा चुराडा केला जात आहे. सदर तीनही प्रकल्पांना चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांच्यावतीने नगरसेवक चंद्रशेखर चौधरी यांनी या निवेदनातून केली आहे.

जनावरांच्या मुक्कामाने अपघाताची भीती
यवतमाळ शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर जनावरांचा मुक्काम अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. भर चौकात जनावरे ठाण मांडून राहात आहे. शहरातल्या जवळपास गर्दीच्या रस्त्यांवर हा प्रकार दिसून येतो. अर्धा अधिक रस्ता व्यापून घेतला गेल्याने दुचाकीस्वारालाही मार्ग काढता येत नाही. यावरही उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

एक खुर्ची ७५०० ची
नाट्यगृहात एक हजार बैठक व्यवस्थेकरिता (खुर्च्या) ७५.४२ लाख अंदाजपत्रकीय रक्कम दर्शविली आहे. याचा अर्थ एका खुर्चीची किंमत सात हजार ५०० रुपये आहे. अशा कुठल्या दर्जाची खुर्ची याठिकाणी बसविली जाणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. बरीच कामे कंत्राटदारांनी अर्धवट सोडली आहे. यानंतरही ७५ ते ८० टक्के देयके नगरपरिषदेने दिली आहे. याही कामाची सर्वंकष चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांच्यावतीने नगरसेवक चंद्रशेखर चौधरी यांनी केली आहे.
 

Web Title: Congress Councilor Aggressive About Municipal Stewardship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.