क्रूड आॅईलची फॅक्टरी बंद करा

By Admin | Updated: December 8, 2014 22:41 IST2014-12-08T22:41:11+5:302014-12-08T22:41:11+5:30

तालुक्यातील भालेवाडी येथे श्री भारतीय सिमेंट्स प्रा.लि.मार्फत चालविण्यात येणाऱ्या भारतीय क्रूड आॅईल फॅक्टरीमुळे परिसरातील गावकऱ्यांचे आरोग्य धाक्यात सापडले आहे.

Close the crude oil factory | क्रूड आॅईलची फॅक्टरी बंद करा

क्रूड आॅईलची फॅक्टरी बंद करा

गावकऱ्यांची मागणी : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कारवाईचे पत्र
मारेगाव : तालुक्यातील भालेवाडी येथे श्री भारतीय सिमेंट्स प्रा.लि.मार्फत चालविण्यात येणाऱ्या भारतीय क्रूड आॅईल फॅक्टरीमुळे परिसरातील गावकऱ्यांचे आरोग्य धाक्यात सापडले आहे. ही फॅक्टरी प्रदूषणाचे नियम तोडून सुरू आहे. ती तत्काळ बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
भालेवाडी येथे गेल्या काही वर्षांपासून श्री भारतीय सिमेंट प्रा.लि. या कंपनीने सिमेंटची निर्मिती बंद केली आहे. आता फॅक्टरीत कालबाह्य झालेले वाहनांचे टायर जाळून त्यापासून क्रूड आॅईल बनविण्याचा कारखाना सुरू केला आहे. क्रूड आॅईलचा कारखाना सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाचे कंपनीने पालन करणे बंधनकारक होते. मात्र प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून क्रूड आॅईलचा कारखाना सुरू करण्यात आला, असा गावकऱ्यांचा आरोप आहे.
याविरुद्ध गावकऱ्यांनी केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहीर यांना निवेदन देऊन कारखाना बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शासकीय तपासणीत अनेक त्रुटी आढळल्याने क्रूड आॅईलचा भालेवाडी येथील कारखाना बंद करावा, असे आदेश उपप्रादेशिक अधिकारी चंद्रपूर यांनी वणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते.
तथापि, आजतागायत हा कारखाना बंद झाला नाही. परिणामी प्रदूषणात सतत भर पडत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी येथील तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनातून सात दिवसात कारखाना बंद न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Close the crude oil factory