आश्रमशाळेत जेवण उघड्यावर

By Admin | Updated: September 29, 2014 23:13 IST2014-09-29T23:13:35+5:302014-09-29T23:13:35+5:30

येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भोजन कक्षाअभावी उघड्यावरच जेवण करावे लागत आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे.

At the Ashramshala dinner open | आश्रमशाळेत जेवण उघड्यावर

आश्रमशाळेत जेवण उघड्यावर

रमेश झिंगरे - बोटोणी
येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भोजन कक्षाअभावी उघड्यावरच जेवण करावे लागत आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांकरिता आश्रमशाळा सुरू केल्या आहेत़ या सर्व शाळा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येतात. पांढरकवडा प्रकल्पाअंतर्गत एकूण ३२ शासकीय आश्रमशाळा, तर २८ अनुदानित आश्रमशाळा आहे़ पांढरकवडा प्रकल्पाअंतर्गत एकूण १८ शासकीय वसतिगृहे आहेत. बोटोणी येथेही शासकीय आश्रमशाळा आहे. त्यात विद्यार्थी निवासी राहतात. त्यांना भोजन व शैक्षणिक सुविधा मोफत देण्यात येतात.
पांढरकवडा प्रकल्पांतर्गत बोटोणी येथे सन १९७२ पासून आदिवासी विद्यार्थ्यांकरिता आश्रशाळा सुरू आहे. या आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंतचे ३८१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ त्यापैकी १५८ विद्यार्थी व १३५ विद्यार्थिनी वसतिगृहातच राहतात. मात्र या सर्व विद्यार्थ्यांना उघड्यावरच जेवण करावे लागत आहे. पावसाळ्यात तर चक्क चिखल असताना तेथेच उघड्यावर जेवण करावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता बळावली आहे.
या आश्रमशाळेत सर्व विद्यार्थ्यांना पंगतीत बसवून जेवण वाढले जाते़ पंगतीत जेवण घेऊन विद्यार्थी नंतर आपल्या सोयीनुसार लगतच्या झाडाखाली अथवा वर्गात जाऊन जेवण करतात़ मात्र या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांकरिता शुद्ध पाण्याची सोय नाही. जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळत नाही. अध्यापन कार्य व भोजन कक्षाची व्यवस्था चक्क वर्गातच असल्याने त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शिक्षणावर होतो.
शासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता अनेक योजना राबविते़ मात्र बेपर्वा अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या योजना प्रत्यक्षात अंमलात येत नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातही अनेकदा कर्मचारीच बळीचा बकरा ठरतात. अदिकारी मात्र नामानिराळेच राहतात.
आठ दिवसांपूर्वी एका खासगी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्याचे खापर त्या आश्रमशाळेच्या अधीक्षकावर फुटले होते. तशीच परिस्थिती कोणत्याही आश्रमशाळेत निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे येथील आश्रमशाळेत सर्वच विद्यार्थी निवासी राहतात. अनेक विद्यार्थी एकाच खोलीत असतात. त्यामुळे त्यांना संसर्गजन्य आजार होण्याचीही शक्यता अधिक असते. या आश्रमशाळेत अध्यापन कार्यासाठी वर्गखोल्या, भोजन कक्ष, निवासस्थान यासाठी अपुऱ्या वास्तू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेवणही उघड्यावरच करावे लागत आहे. कर्मचाऱ्यांनाही गावात भाड्याने खोल्या घेऊन वास्तव्य करावे लागत आहे. काही कर्मचाऱ्यांना नाईलाजाने बाहेर गावावरून येणे-जाणे करावे लागत आहे. परिणामी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे नव्याने वास्तू बांधाव्या, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे़

Web Title: At the Ashramshala dinner open