संतप्त काॅंग्रेस नगरसेवकांनी रोखले जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 05:00 AM2021-06-12T05:00:00+5:302021-06-12T05:00:16+5:30

यवतमाळ शहरात प्रत्येक रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. कोरोना महामारीतही हे ढिगारे कायम होते. पावसाळ्यातही कचऱ्याचे ढिगारे कायम आहेत. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये शहरातील घाण तत्काळ स्वच्छ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

Angry Congress corporators stopped the Collector's vehicle | संतप्त काॅंग्रेस नगरसेवकांनी रोखले जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन

संतप्त काॅंग्रेस नगरसेवकांनी रोखले जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन

Next
ठळक मुद्देयवतमाळात कचरा प्रश्न पेटला : आदेशानंतरही कार्यवाही नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेने पावसाळ्याच्या तोंडावरही उपाययोजना केल्या नाही. याशिवाय कचऱ्याचा प्रश्न गत अनेक महिन्यांपासून गंभीर झाला आहे. यानंतरही नगरपरिषद प्रशासन हा विषय गांभीर्याने घ्यायला तयार नाही. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना कचऱ्याच्या प्रश्नावर धारेवर धरले होते. त्यानंतरही शहरातील कचरा उचलला गेला नाही. ग्राऊंड रिॲलिटी सांगण्यासाठी संतप्त नगरसेवकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अडवून धरण्याचा प्रयत्न झाला तर प्रश्नाचे गांभीर्य दर्शविण्यासाठी थेट कचरा प्रवेशद्वारावरच आणून फेकण्यात आला. यामुळे शुक्रवारी एकच खळबळ उडाली. 
यवतमाळ शहरात प्रत्येक रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. कोरोना महामारीतही हे ढिगारे कायम होते. पावसाळ्यातही कचऱ्याचे ढिगारे कायम आहेत. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये शहरातील घाण तत्काळ स्वच्छ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. या सूचनेनंतरही नगरपरिषदेने शहरातील कचरा उचलला नाही. यामुळे शुक्रवारी कचऱ्याची परिस्थिती गंभीर होती. यामुळे नगरसेवक चंदू चौधरी, विशाल पावडे, नगरसेविका दर्शना इंगोले, पल्लवी रामटेके यांच्यासह काही नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर कचऱ्याने भरलेला ट्रॅक्टर नेला आणि तो जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारावरच रिकामा करण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत होते. त्या वाहनाला नगरसेविका दर्शना इंगोले यांनी अडविले. यानंतरही वाहन थांबत नसल्याने त्या वाहनापुढे आडव्या झाल्या. परिस्थिती गंभीर होणार हे लक्षात येताच उपविभागीय अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी त्यांना रस्त्यावरून खेचले. वाहनाला मार्ग मोकळा केला. या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, चर्चा झाली नाही. उलट त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. नगरसेवकांनी स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर आक्षेप घेत नारेबाजी केली. 

आंदोलक नगरसेवकांवर गुन्हे दाखल 
- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचऱ्याचा ट्रॅक्टर नेऊन तो रिकामा करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी चंद्रशेखर चौधरी, पल्लवी रामटेके, दर्शना इंगोले, विशाल पावडे, जुल्फीकार अहेमद यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्याविरुद्ध कलम ३४१, १८८, २६९, भादंवि सहकलम १३५ यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. आंदोलकांना तत्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले. 

Web Title: Angry Congress corporators stopped the Collector's vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.