Accident due to animals in Umarkhed city | उमरखेड शहरात मोकाट जनावरांमुळे अपघात
उमरखेड शहरात मोकाट जनावरांमुळे अपघात

ठळक मुद्देसंडे अँकर । नगरपरिषद प्रशासन उदासीन, मुख्य मार्गावर ठिय्या, विद्यार्थी त्रस्त, वाहनधारकांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शहरातील वर्दळीच्या नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गसह सर्व प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मोकाट जनावरांना चुकवून वाहने चालविताना अपघात होत आहे. यात दररोज अनेक जण जखमी होत आहे. परिणामी नागरिक व वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
रस्त्यांवरील मोकाट जनावरांमुळे अपघात वाढत असल्याने नागरिक संतापले आहे. एखाद्याचा बळी गेल्यानंतरच पालिका प्रशासन मोकाट जनावर मालकांवर कारवाई करणार काय, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पालिकेच्या उदासीनतेमुळे मोकाट जनावरांनी रस्त्यांवरच ठिय्या मांडल्याने नागरिक त्रस्त आहे. विशेषत: शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. नांदेड, पुसद, ढाणकी, महागाव या चारही रस्त्यांवर मोकाट जनावरांचे कळप ठिय्या मांडून बसतात. २४ तास त्यांचा मुक्काम रस्त्यांवरच असतो. याशिवाय शहरातील इतर लहान रस्ते, प्रमुख सिमेंट रस्ते, डांबरी रस्त्यांवर मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. त्यांच्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. जनावरांनी रस्त्याच्या मध्यभागी ठिय्या मांडल्याने वाहने समोर काढावी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या रस्त्यांवरील खड्डे आणि जनावरांची नागरिकांमध्ये चांगलीच दहशत दिसून येत आहे.

पोलिसांचेही कायम दुर्लक्षच
लगतच्या जिल्ह्यात पोलिसांनी मोकाट जनावर मालकांना सीआरपीसी १४९ नुसार नोटीस बजावली. मात्र येथील पोलीस विभाग या मोकटा जनावरांकडे दुर्लक्ष करीत आहे. पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुणे शहरात मोकाट जनावरांची समस्या कायम आहे. पालिा आणि पोलीस प्रशासनाने मोकाट जनावरे मालकांबाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक आणि वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.

मालकांवर कठोर कारवाई होत नाही
शहरात मोकाट जनावरांनी हैदोस घातला आहे. जनावरे चौकात ठिय्या मांडून बसल्याने दररोज अपघात होत आहे. मात्र नगरपरिषद प्रशासन अद्यापही उदासीन असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मात्र जनावर मालकांवर कठोर कारवाई केली जात नाही.


Web Title: Accident due to animals in Umarkhed city
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.