८८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बयान

By Admin | Updated: September 13, 2014 00:37 IST2014-09-13T00:37:30+5:302014-09-13T00:37:30+5:30

सुमारे १० वर्षांपूर्वी घडलेल्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून चौकशी सुरू आहे.

88 Police officers-employees' statements | ८८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बयान

८८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बयान

यवतमाळ : सुमारे १० वर्षांपूर्वी घडलेल्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून चौकशी सुरू आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह यांच्या नेतृत्वात ही चौकशी केली जाणार असून त्यासाठी तत्कालीन ८८ पोलीस अधिकारी-कर्मचारी व संबंधितांना नोटीस जारी करण्यात आली आहे.
सन २००३ मध्ये धामणगाव रोडवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी सुरेश सोनकुसरे आणि अजय मोहिते या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात असताना त्या युवकांना विष प्राशन केलेल्या अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या दहा वर्षांपासून हे प्रकरण विविध न्यायालयांमध्ये गाजते आहे. सर्वोच्च न्यायालयाने दहा वर्ष जुन्या या प्रकरणाची दखल घेत औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश देऊन तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. ११ सप्टेंबरपासून या चौकशीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र अचानक महासंचालकांनी बैठक बोलविल्याने आयुक्त राजेंद्रसिंह मुंबईला निघून गेले. त्यामुळे हा कार्यक्रम बारगळला. आता या चौकशीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान या चौकशीच्या अनुषंगाने प्रकरणाशी संबंधित तत्कालीन सुमारे ८८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटीस जारी करून बयानासाठी हजर राहण्याचे सूचित करण्यात आले. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अमितेशकुमार यांचे बयान औरंगाबादला नोंदविणार की यवतमाळात हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
ते सध्या औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर आणि मृताच्या नातेवाईकाने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा कायम ठेवला. (प्रतिनिधी)

Web Title: 88 Police officers-employees' statements