रातराणी बसफेरी सुरू व्हायला मुहूर्त सापडेना!

By Admin | Updated: September 2, 2016 01:09 IST2016-09-02T01:09:27+5:302016-09-02T01:09:27+5:30

प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर; चार महिन्यांपूर्वी दिले होते विभाग नियंत्रकांना पत्र.

Night of the night! | रातराणी बसफेरी सुरू व्हायला मुहूर्त सापडेना!

रातराणी बसफेरी सुरू व्हायला मुहूर्त सापडेना!

रिसोड (जि. वाशिम), दि. १: रिसोड येथून पुणे व पंढरपूर मार्गावर रातराणी बसफेर्‍या सुरु करण्याबाबत एस.टी. महामंडळ मुंबई महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना पत्र देऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. अद्यापही रातराणी बसफेरी सुरू झाली नाही. यामुळे प्रवासी वर्गामधून नाराजीचा सूर उमटत आहे.
रिसोड आगारामधून पुणे व पंढरपूर मार्गावर बससेवा सुरू करण्याबाबत खासदार भावना गवळी यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पत्र दिले होते. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापकांनी अकोला विभाग नियंत्रकांना २७ एप्रिल २0१६ च्या पत्रान्वये मंजुरी दिली होती. चार महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा बससेवा सुरू करण्याचा मुहूर्त रिसोड आगाराला सापडला नाही. महाव्यवस्थापकांच्या पत्राला येथे केराची टोपली दाखविली जात असल्याचे दिसून येते. यासंदर्भात रिसोड आगारप्रमुख स्वप्निल अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता, अद्याप अकोला विभाग नियंत्रकाचे पत्र प्राप्त नसल्याचे अहिरे यांनी सांगितले.

Web Title: Night of the night!