पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By Admin | Updated: September 10, 2015 02:17 IST2015-09-10T02:17:02+5:302015-09-10T02:17:02+5:30

बैलांचा साज विक्रेते ग्राहकांच्या प्रतिक्षेत; यंत्राच्या वापरामुळे बैलांच्या संख्येत घट.

Due to drought | पोळा सणावर दुष्काळाचे सावट

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

वाशिम : बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकर्‍यांचा महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. दरवर्षी शेतकर्‍यांवर कोसळणारे अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे शेतकरी पार खचलेला आहे. १२ सप्टेंबर रोजी पोळा सणानिमित्त जिल्ह्यात बैलांचा साज विक्रेत्यांनी मोठय़ा प्रमाणात दुकाने थाटली आहेत; परंतु यावर्षी पावसाने मारलेल्या दांडीमुळे शेतकर्‍यांची पिके सुकण्यावर आली आहेत, तर काही शेतकर्‍यांकडे पाणी असतानाही विद्युत पुरवठय़ाअभावी ते देऊ शकत नसल्याने यावर्षीचा पोळा सणावर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. जिल्ह्यात बैलांचा साज विक्रेते खरेदी करणार्‍या शेतकर्‍यांची प्रतीक्षा करीत आहेत; मात्र कोणीही त्यांच्याकडे फिरकून पाहत नसल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. जिल्ह्यातील वाशिम शहरामध्ये १0, मालेगाव शहरात सहा, मानोरा शहरात चार, कारंजा शहरात १0, तर रिसोड व मंगरुळपीर प्रत्येक सहा बैलांच्या साज विकणार्‍यांची दुकाने लागली आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यातीलच मोठय़ा बाजारपेठ असलेल्या शेलूबाजार, अनसिंगसारख्या ठिकाणीही काही प्रमाणात दुकाने थाटली आहेत. दोन दिवसांवर पोळा सण राहिला असताना अद्यापपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात विक्री झाले नसल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. जिल्ह्यात ९ सप्टेंबर रोजी पाऊस झाल्याने पोळा सण उत्साहात साजरा केला जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Due to drought