पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी

By Admin | Updated: January 1, 2015 01:36 IST2015-01-01T01:36:33+5:302015-01-01T01:36:33+5:30

वाशिम जिल्ह्यातील ४३९ गावांमध्ये राबवल्या जाणार ६0१ उपाययोजना ; ९३ गावांत टँकरने पाणी.

Approval of water scarcity action plan | पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी

पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याला जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी मंजुरी दिली आहे. या आराखड्यानुसार जानेवारी ते जून २0१५ या सहा महिन्यांमध्ये जिल्ह्यातील ४३९ गावांमध्ये ६0१ विविध उपाययोजना प्रामुख्याने राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण ५ कोटी ४७ लाख ९८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे प्रस्तावित आहे.
जिल्हय़ातील १0८ गावांमधील १0९ विहिरींचे खोलीकरण करण्याच्या कामाचा या आराखड्यात समावेश असून, त्यासाठी ५४ लाख ५0 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे तसेच जिल्हय़ातील २७९ गावांमधील २८४ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या जाणार असून, त्यावर १ कोटी ४१ लाख ४८ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. ७१ गावांमध्ये ८१ नवीन विंधन विहिरी घेतल्या जाणार असून, त्यासाठी ४८ लाख ६0 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
संभाव्य टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचाही आधार घेतला जाणार असून, ९३ गावांकरिता ९५ टँकर सुरू करण्यात येणार आहेत.
त्यासाठी १ कोटी ८९ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, सर्वाधिक २५ टँकर मालेगाव तालुक्यात सुरू केले जाणार आहेत.
वाशिम तालुक्यातील १४, रिसोड तालुक्यातील सहा, मंगरुळपीर तालुक्यातील सहा, मंगरुळपीर तालुक्यातील १६, मानोरा तालुक्यातील १५ व कारंजा तालुक्यातील १७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यातील ३९१ गावांतील ७४१ हातपंप दुरुस्त केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या देखभाल व दुरुस्ती निधीतून ५९ लाख २८ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

Web Title: Approval of water scarcity action plan