तब्बल ८ पदे रिक्त; आराेग्य सेवेचा बट्टयाबाेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST2021-09-05T04:47:46+5:302021-09-05T04:47:46+5:30

शिरपूर जैन : येथील आरोग्यवर्धनी केंद्रातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चार आरोग्य सेविका, दोन आरोग्य सेवक, एक आरोग्य सहाय्यीका या ...

8 vacancies; Battayabal of health service | तब्बल ८ पदे रिक्त; आराेग्य सेवेचा बट्टयाबाेळ

तब्बल ८ पदे रिक्त; आराेग्य सेवेचा बट्टयाबाेळ

शिरपूर जैन : येथील आरोग्यवर्धनी केंद्रातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चार आरोग्य सेविका, दोन आरोग्य सेवक, एक आरोग्य सहाय्यीका या महत्वाचे ८ पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठे आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्राची ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी तीन कोटी रुपये खर्च करून आरोग्यवर्धिनी केंद्राची नवीन इमारत बांधकाम करण्यात आले आहे. जवळपास तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असलेल्या आरोग्य वर्धनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐश्वर्या भालेराव ह्या एकमेव कार्यरत आहेत. आरोग्य वर्धनी केंद्राअंतर्गत ५१ हजार लोकसंख्या लक्षात घेता किमान येथे दोन वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. त्यातच आरोग्य सहाय्यीका सेवानिवृत्त झाल्याने या पदासह शिरपूर भाग तीन, खंडाळा, करंजी, वसारी येथील आरोग्य सेविकेची पदे रिक्त आहेत. यासह खंडाळा व करंजी येथील आरोग्य सेवक पदही रिक्त आहे. ३३ गावाचा समावेश असलेल्या शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये ऐवढया मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने याचा आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. त्यातच कोरोना लसीकरण व टेस्टिंगसाठी नेमणूक केलेल्या कत्रांटी कर्मचाऱ्यांना सेवा मुक्त केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यावर लसीकरण व टेस्टिंगची अतिरिक्त जबाबदारीही आली आहे.

करंजी व खंडाळा केंद्रातही कमतरता

करंजी केंद्राअंतर्गत शेलगाव बोंदाडे,शेलगाव बगाडे,वाघळूद,वाकद,दापूरी वसाणी या गावाचा समावेश आहे. येथील आरोग्य सेवक व आरोग्य सेविका दोन्ही पदे रिक्त आहेत. तसेच खंडाळा उपकेंद्र अंतर्गत वाघी, कोठा, ढोरखेडा, बोराळा, शेलगाव खवणे या गावांचा समावेश आहे येथील आरोग्यसेविका पद रिक्त आहे.सोबतच वसारी उपकेंद्रातील आरोग्य सेविका पद रिक्त आहे.

Web Title: 8 vacancies; Battayabal of health service