दरोडेखोरांकडून लाखोंची लूट

By Admin | Updated: July 18, 2015 23:07 IST2015-07-18T23:07:34+5:302015-07-18T23:07:34+5:30

वसई पूर्व भागात भाताणे, जांबुलपाडा, नवसई, आडणे या गावांमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी तीन बंगल्यांमध्ये लूट करून जांबुलपाडा येथील दत्त मंदिराची दानपेटी लंपास केली.

Robbery loot millions | दरोडेखोरांकडून लाखोंची लूट

दरोडेखोरांकडून लाखोंची लूट

पारोळ : वसई पूर्व भागात भाताणे, जांबुलपाडा, नवसई, आडणे या गावांमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी तीन बंगल्यांमध्ये लूट करून जांबुलपाडा येथील दत्त मंदिराची दानपेटी लंपास केली. त्याचप्रमाणे आडणे गावातील विपुल जाधव यांची दुचाकीही चोरून नेली. या दरोडा घातलेल्या बंगल्यांमध्ये त्या रात्री कुणीही नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
अज्ञात दरोडेखोरांनी भाताणे गावातील बालकृष्ण पाटील यांचा बंगला फोडून घरातील चांदी व रोकड पळवली. त्यानंतर, त्याच गावातील सुधीर कासार यांचा बंगला फोडून सोने, चांदी व रोकड अशी १ लाखाच्या मालाची लूट केली. जांबुलपाड्यातील सुधाकर मडके यांची घरातील रोकड व त्याच गावातील दत्त मंदिरातील दानपेटी दरोडेखोरांनी पळवून नेली.
नवसई गावातील दीपेश पाटील यांची दुचाकीही त्यांनी चोरली होती. परंतु, ती खराब झाल्याने त्यांनी शेतात टाकून पळ काढला. विशेष म्हणजे तिन्ही बंगल्यांत त्या रात्री कुणीही नव्हते. त्यामुळे हे दरोडे या घरांवर पाळत ठेवून टाकले असल्याचे भाताणे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनांची नोंद मांडवी पोलिसांत झाली असून पोलिसांनी दरोडा पडलेल्या बंगल्यांचा पंचनामा केला असून अज्ञात दरोडेखोरांवर गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास मांडवी पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Robbery loot millions