लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : विरारच्या फुलपाडा परिसरात रेल्वे कर्मचाऱ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने खळबळ उडाली आहे. एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून आणि पैशांची मागणी करून कर्मचाऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलल्याचा गंभीर आरोप दोन जणांवर करण्यात आला आहे. लालजी रामसजीवन सरोज (३२), असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, ते रेल्वेमध्ये फिटर पदावर कार्यरत होते. याप्रकरणी विरार पोलिसांनी दोघांविरुद्ध शनिवारी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
मृत लालजी सरोज हे विरारच्या फुलपाडा येथील जगन्नाथ अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांची पत्नी आणि मुले मूळ गावी गेल्यामुळे ते
घरात एकटेच होते. त्यांच्या घरातून बुधवारी दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी त्यांच्या नातेवाइकांना दिली. नातेवाइकांनी तत्काळ विरार
पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, लालजी हे घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत
आढळले. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने गंभीर जखम झालेली होती, तर जवळच रक्ताने माखलेला चाकू पोलिसांना सापडला.
दाेघांनी दिला मानसिक त्रास
सुरुवातीला या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले होते. मात्र, मृत लालजींच्या भावाने विरार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणातील वास्तव समोर आले आहे. तक्रारीनुसार, राकेश तिवारी आणि असलम शेख हे दोघे जण गेल्या काही दिवसांपासून लालजी यांना मानसिक त्रास देत होते.
भावा, लपून फोन करताेय...
मृत्यूपूर्वी लालजी यांनी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आपल्या भावाला फोन केला होता. मला त्यांच्या भीतीने लपून फोन करावा लागत आहे, ते मला सतत धमकावत आहेत असे लालजी यांनी भावाला सांगितले होते.
सततचा मानसिक छळ, ब्लॅकमेलिंगला कंटाळून लालजीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित आरोपी राकेश तिवारी हा पत्रकार असल्याची बतावणी करून धमक्या देत होता. विरार पोलिसांनी याप्रकरणी राकेश तिवारी, असलम शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : A railway worker in Virar was found dead, with allegations of blackmail and harassment leading to suicide. Police have registered a case against two individuals for abetment.
Web Summary : विरार में एक रेलवे कर्मचारी मृत पाया गया, ब्लैकमेल और उत्पीड़न के आरोपों के बाद आत्महत्या का मामला सामने आया है। पुलिस ने दो व्यक्तियों के खिलाफ आत्महत्या के लिए उकसाने का मामला दर्ज किया है।