शेती हंगामातच दुसरा डोस आल्याने लसीकरण मंदावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 05:00 AM2021-06-30T05:00:00+5:302021-06-30T05:00:06+5:30

कोविड मृत्यू रोखण्यासाठी लाभार्थ्यांना दिली जात असलेल्या दोन्ही लसी परिणामकारकच आहेत. लस घेतलेल्या व्यक्तीला कोविडचा संसर्ग झाला तरी बहुतांश व्यक्तींवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही. शिवाय कोविडला हरविण्यासाठी तसेच त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सध्या लस हाच उत्तम पर्याय असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात; पण सध्या शेतीच्या कामांनाही शेतकरी व शेतमजूर गती देत आहेत. 

Vaccination slowed down due to the second dose during the agricultural season | शेती हंगामातच दुसरा डोस आल्याने लसीकरण मंदावले

शेती हंगामातच दुसरा डोस आल्याने लसीकरण मंदावले

Next
ठळक मुद्देग्रामीण भागातील अडचण : शेतीकामे सोडून येणे नागरिकांना कठीणच

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असली तरी देवळी तालुक्यातील ग्रामीण भागात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लसीकरणाला सुरुवात झाली. लसीच्या दोन डोसमध्ये काही विशिष्ट अंतर ठेवण्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत असले तरी सध्या शेतकरी व शेतमजूर शेतीच्या कामांना प्राधान्य देत असल्याने याचा विपरीत परिणाम सध्या लसीकरण मोहिमेवर होत आहे. पहिले लस घ्यावी की शेतीचे काम झटपट पूर्ण करावे, अशी द्विधा मन:स्थिती सध्या शेतकरी व शेतमजुरांची आहे.
कोविड संकटाच्या काळात शेती याच व्यवसायाने जिल्ह्याचे अर्थचक्र पूर्ण पदावर आणण्यासाठी मोठा हातभार लावला. तर कोविड मृत्यू रोखण्यासाठी लाभार्थ्यांना दिली जात असलेल्या दोन्ही लसी परिणामकारकच आहेत. लस घेतलेल्या व्यक्तीला कोविडचा संसर्ग झाला तरी बहुतांश व्यक्तींवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही. शिवाय कोविडला हरविण्यासाठी तसेच त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सध्या लस हाच उत्तम पर्याय असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात; पण सध्या शेतीच्या कामांनाही शेतकरी व शेतमजूर गती देत आहेत. 
अशातच पूर्वी लस घ्यावी की शेतीची कामे करावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना सतावत आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच जर ग्रामीण भागात लसीकरण पूर्ण झाले नाही तर ग्रामीण भागातील नागरिकांना कोविडचा सामना करावा लागणार आहे. लस घेतल्यावर काहींना ताप येतो. त्यामुळे लस घेतल्यावर विश्रांती गरजेची असते; पण ऐन लागवडीच्या हंगामात लस घेऊन विश्रांती करणे हे न परवडणारे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या लसीकरण मोहिमेवर याचा परिणाम होत आहे.

शहरात लसीचा पुरेसा पुरवठा नाही

- लसीकरणाची मोहीम गतीने सुरू असली तरी अनेक केंद्रांवर लसीचा पुरेसा पुरवठा नाही. त्यामुळे नागरिकांना आल्यापवलीच निराश होऊन परतावे लागत आहे. तर ग्रामीण भागात खरीप हंगामातील शेतीची कामे जोरात सुरू आहेत. अनेक ठिकाणी पावसाने दडी मारलेली असल्याने शेतकरीबांधवांना ओलित करण्यास जावे लागत आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर अद्याप लसीकरणासाठी सरसावलेले नाहीत. यामुळे लसीकरण केंद्रांवर फारशी गर्दी दिसून येत नाही. 

 

Web Title: Vaccination slowed down due to the second dose during the agricultural season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.