सोयाबीन बियाणे महागले

By Admin | Updated: June 15, 2014 23:44 IST2014-06-15T23:44:01+5:302014-06-15T23:44:01+5:30

मागील वर्षी अतिवृष्टी व गारपीटीच्या कटू आठवणी विसरुन शेतकरी पुन्हा खरीपाच्या तयारीला लागला आहे; परंतु यंदा सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत अव्वाच्या सव्वा वाढ केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Soybean Seed Expensive | सोयाबीन बियाणे महागले

सोयाबीन बियाणे महागले

शेतकरी हवालदिल : खरिपाची तयारी सुरू
पिंपळखुटा : मागील वर्षी अतिवृष्टी व गारपीटीच्या कटू आठवणी विसरुन शेतकरी पुन्हा खरीपाच्या तयारीला लागला आहे; परंतु यंदा सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत अव्वाच्या सव्वा वाढ केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
गत वर्षीच्या तुलनेत यंदा कपाशी बियाण्यांच्या किमतीत थोडीफार वाढ झाली. मात्र सोयाबीन बियाण्यात ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीन हे मुख्यत्वेकरुन कोरडवाहू पीक आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वरच्या पावसावरच अवलंबून राहावे लागते. त्यातच पाऊस कमी झाला किंवा मान्सून उशीराने पोहोचला तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागते. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीनचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी पारंपरिक बियाणे राहिलेले नाही. त्याला बियाणे विकत घेण्याची वेळ आली आहे. पण बियाण्यांच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा वाढविण्याचा विचार केलेला दिसत आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच बियाण्यांच्या वाढत्या किंमतींमुळे आर्थिक संकट ओढवले आहे.
लग्नसराईची घाई आता संपत आली आहे. शेतकरी आता खरीपाच्या कामासाठी आतूर झाला आहे. मान्सून वेळेवर येणार असे वर्तविण्यात आले होते. आता मात्र मान्सून लांबणीवर जाणार असल्याचे संकेत दिसत आहे. त्यामुळे शेतकरी मृगाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामाच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून या दिवसात शेती मशागतीची कामे केली जातात; मात्र यंदा पेरणीयोग्य जमीन तयार करण्याकरिता लागणाऱ्या खर्चात एकरी २०० ते ३०० रुपये वाढ झाली आहे. परिणामी शेतजमीन तयार करण्याचे काम महागले आहे. या काही वर्षात प्रगतीपेक्षा शेतकरी वर्गाची पिछेहाट होताना दिसत आहे. कधी काळी शेतीची अवजारे, खते, बी-बियाण्यांबाबत स्वावलंबी असलेला हा वर्ग आता प्रत्येक बाबतीत परावलंबी झाला आहे. बैलजोडी सांभाळणे खर्चिक बाब झाल्याने पशुधन विकीस निघाले आहे. ट्रॅक्टरचा उपायोग सर्वत्र केला जात आहे.
यावर्षी वाढलेले बियाण्याचे भाव, महागडा मशागतीचा खर्च, मजुरांचे वाढलेले दर या सर्व समस्येला बाजुला ठेवून शेतकरी पुन्हा नफ्यातोट्याच्या शेतीकरीता सज्ज झाल्याचे दिसत आहे.(वार्ताहर)

Web Title: Soybean Seed Expensive