योजना बंद; पण चळवळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 05:00 AM2020-08-02T05:00:00+5:302020-08-02T05:00:40+5:30

कविवर्य विंदा करंदीकर यांच्या ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याचे घेत जावे...घेता-घेता घेणाऱ्याने, देणाऱ्याचे हातच घ्यावे’ या दोन ओळींनी निसर्गाने आतापर्यंत केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची मनोवृत्ती निर्माण होते. विकासाच्या झंझावातात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता मानवजातीला भरभरून देणाऱ्या निसर्गावरच संक्रांत आली.

Plan off; But the movement continues | योजना बंद; पण चळवळ सुरू

योजना बंद; पण चळवळ सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देअविरत वृक्षारोपणाने दाटतेय हिरवळ । वर्धेकरांचे पाऊल पडतेय पुढे

सुहास घनोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्ध्याला चळवळीची परंपरा लाभली असून ती आजही कायम आहे. निसर्गाचा समतोल राखण्याच्यादृष्टीने दरवर्षी शासनाकडून वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे वर्धेकरांच्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन चळवळीला आणखीनच बळ मिळाले. मात्र, राज्यकर्त्यांचा खांदेपालट झाल्यानंतर शासनाने वृक्षारोपणाची योजना गुंडाळली. तरीही वर्ध्यात सामाजिक संघटना आणि निसर्गप्रेमींचा वृक्षलागवडीचा ध्यास कायम असल्याने शहरासह लगतचा परिसर हिरवागार होत आहे.
कविवर्य विंदा करंदीकर यांच्या ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याचे घेत जावे...घेता-घेता घेणाऱ्याने, देणाऱ्याचे हातच घ्यावे’ या दोन ओळींनी निसर्गाने आतापर्यंत केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची मनोवृत्ती निर्माण होते. विकासाच्या झंझावातात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता मानवजातीला भरभरून देणाऱ्या निसर्गावरच संक्रांत आली. पशु-पक्ष्यांसह मानवालाही जीवन असह्य व्हायला लागल्याने वर्ध्यामध्ये सर्वप्रथम निसर्ग सेवा समितीने वृक्ष लागवड व संगोपनासाठी पुढाकार घेतला. सोबतच इतरही सेवाभावी संस्था आणि निसर्गप्रेमींनी पुढाकार घेत वृक्षारोपणाची चळवळ गतिमान केली. याच दरम्यान शासनाने शतकोटी, १३ कोटी आणि ३३ कोटी वृक्षलागवड मोहीम हाती घेतली.
शासकीय योजना असल्याने जिल्ह्यातील वृक्षारोपण आणि संवर्धनाची आकडेवारी शासनदरबारी कागदोपत्रीच फाईलबंद झाली. सर्वच नाही पण, काही वृक्ष जगले असले तरीही त्यापेक्षा सेवाभावी संस्था आणि निसर्गप्रेमींच्या चळवळीतून उभ्या राहिलेल्या वृक्षांची संख्या कित्येक पटीने अधिक आहे. त्यामुळेच आता वृक्षलागवडीची योजना बंद झाली तरीही नियमित वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची धडपड वर्ध्यात अविरत सुरूच असल्याने शहरातील रस्त्यालगतचा परिसर, टेकड्या व उद्याने हिरवेगार झाले आहेत.

निसर्ग संदेश देणारी निसर्ग सेवा समिती
निसर्ग सेवा समितीने चळवळीचे ‘रोपण’ केल्याने त्याचा आता ‘वटवृक्ष’ झाला आहे. एक फोन केल्याबरोबर रोप व ट्रीगार्डसह सर्व व्यवस्था घरपोच करून देण्याची सुविधा निसर्ग सेवा समितीने उपलब्ध करून दिल्याने याला वर्धेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी आयटीआयजवळील टेकडीवर दहा एकर परिसरात निसर्ग हिल्स, ऑक्सिजन पार्क तयार केला असून या ठिकाणी लोकसहभाग व श्रमदानातून १५ हजारांवर वृक्षरोपांची लागवड केली आहे. यामध्ये शंभर प्रजातीचे विविध दीर्घजीवी वृक्ष लावण्यात आले आहेत. ‘घन-वन’अंतर्गत ८०० वृक्षांची लागवड केली आहे. शासकीय विश्रामगृह ते नालवाडी चौक आणि दादाजी धुनिवाले चौक ते आर्वी नाका या प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड केल्याने या परिसरामधील सौंदर्यात भर पडली आहे.

खडकाळ टेकडीवर हिरवळ फुलविणारे ‘व्हीजेएम’
मनुष्याच्या निरोगी आरोग्यासाठी धडपडणारे डॉक्टरांचे हात निसर्गाच्या आरोग्यासाठीही पुढे आल्याने वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने लोकसहभाग व श्रमदानातून ओसाड माळरानावर हिरवळ दाटली आहे. पिपरी परिसरातील हनुमान टेकडीवर ‘व्हीजेएम’च्या माध्यमातून विविध प्रजातीच्या १८ हजार ५०० वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपनही केले आहे. याही परिसराला ‘ऑक्सिजन पार्क’ असे नाव दिले असून येथे सुरुवातीला १३ हजार रोपे लावली होती. त्यांचे गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये बहारदार वृक्ष तयार झाले आहे. तसेच ‘मियावाकी’ वनामध्ये मागीलवर्षी साडेपाच हजार वृक्षांची लागवड केली होती. त्यामध्ये यावर्षी जुलै महिन्यात आणखी १ हजार ७०० झाडांची भर पडली आहे.

दरवर्षीप्रमाणे ५ जून ते ३१ जुलैपर्यंत वृक्षलावगडीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत लोकसहभाग व श्रमदानातून ऑक्सिजन पार्क निसर्ग हिल येथे १ हजार वृक्षांची लागवड केली आहे. तसेच शहरातील विविध मार्गावरही वृक्ष लावले असून येत्या ३१ ऑगस्टपर्यंत मियावाकी प्रकल्पात दोन हजार वृक्ष रोप लावण्याचा संकल्प आहे. या कार्यात वर्धेकरांसह निसर्गप्रेमींची साथ मिळत आहे.
मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष, निसर्ग सेवा समिती, वर्धा

Web Title: Plan off; But the movement continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.