आदिशक्तीची स्थापना

By Admin | Updated: October 14, 2015 02:06 IST2015-10-14T02:06:29+5:302015-10-14T02:06:29+5:30

प्रेम से बोलो जय माता दी... बोलो अंबे मात की जय... जय अंबे.. जय दुर्गे.. अशा गगनभेदी जयघोषासह ढोल-ताशांच्या निनादात...

Establishment of Adashakti | आदिशक्तीची स्थापना

आदिशक्तीची स्थापना

ढोल-ताशांचा निनाद.. जय अंबे.. जय दुर्गेच्या गजरात
वर्धा : प्रेम से बोलो जय माता दी... बोलो अंबे मात की जय... जय अंबे.. जय दुर्गे.. अशा गगनभेदी जयघोषासह ढोल-ताशांच्या निनादात जिल्ह्यात मंगळवारी सर्वत्र आदिशक्तीची स्थापना करण्यात आली. सर्वाच्याच ओठांवर केवळ जगदंबेचा गजर होता. सकाळपासून रात्रीपर्यंत दुर्गेची स्थापना सुरूच होती. वर्धा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण होते. आजपासून सतत नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी वर्धानगरी रोषणाईने उजळून निघाली आहे.
अश्विन महिन्यात येत असलेल्या या नवरात्र उत्सवाला शरदीय नवरात्र असेही म्हणतात. या उत्सवात जिल्ह्यात बहुसंख्य घरांमध्ये घटस्थापना केली जाते. नऊ दिवसांसाठी अखंड दीप प्रज्वलित केला जातो. यासह हजारावर सार्वजनिक मंडळाद्वारे दुर्गामूर्तीची स्थापना केली जाते. यामध्ये वर्धा शहरातील दुर्गोत्सव तर डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. मंडळाची नाविण्यपूर्ण सजावट, आकर्षक रोषणाई यासह नऊही दिवस होणारे अन्नदान आणि धार्मिक कार्यक्रम भाविकांसाठी आकर्षण ठरणारी असतात. या नऊ दिवसांत प्रत्येक मंडळाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन असते.
मंगळवारी सकाळपासूनच बँडच्या गजरात दुर्गामूर्तीची भव्य मिरवणूक निघाली. यावेळी पोलिसांकडून बंदोवस्तही ठेवण्यात आला होता. त्याचप्रकारे मंडळांनीही अतिशय संयमाने मिरवणूक काढल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
देवी आसनस्थ असलेला मंच हा नाविण्यपूर्ण आणि भव्य असावा, असा प्रयत्न मंडळांचा असल्याचे दिसून आले. त्यात अनेक मंडळांनी पर्यावरणाचा विचार करून कापड आणि इकोफ्रेंडली साहित्याचा वापर करून सजावट केल्याचे दिसले. मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात देवीच्या मूर्तीची स्थापना मंंडळांद्वारे सुरूच असल्याचे दिसून आले. मंडळांच्या देवीसह स्थापित व जागृत देवी मंदिरांमध्येही आदिशक्तीचा जागर सुरू झाला आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Establishment of Adashakti