वीज तारांच्या स्पर्शाने बैलजोडी ठार

By Admin | Updated: June 19, 2016 01:59 IST2016-06-19T01:59:33+5:302016-06-19T01:59:33+5:30

शेतात वखरणीचे काम सुरू असताना शेतात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारांना बैलजोडीचा स्पर्श झाला.

Electricity kills the bullocks with the touch of the wires | वीज तारांच्या स्पर्शाने बैलजोडी ठार

वीज तारांच्या स्पर्शाने बैलजोडी ठार

रिधोरा येथील घटना : शेतकऱ्याचे ७० हजारांचे नुकसान
सेलू : शेतात वखरणीचे काम सुरू असताना शेतात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारांना बैलजोडीचा स्पर्श झाला. यात दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी काम करीत असलेल्या इसम थोडक्यात बचावला. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता तालुक्यातील रिधोरा येथे घडली.
मनोहर सावरकर यांनी मौजा रिधोरा येथील अशोक श्रीराम यांचे शेत ठेक्याने केले होते. शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यामुळे सकाळी शेतात सारण्या फाडण्याच्या कामासाठी तो शेतात बैलजोडी घेऊन गेला होता. शेतात जिवंत विद्युत तारा पडून असतील, याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती. यामुळे काम करीत असताना बैलांचा स्पर्श वीज तारांना झाला. यात बैलजोडी घटनास्थळीच ठार झाली. वखरणीचे काम करणारा भैया कुडसंगे हा मात्र थोडक्यात बचावला. ऐन हंगामात घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बैलजोडी ठार झाल्याने शेतकऱ्याचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. या शेतकऱ्याला महावितरण कंपनीने त्वरित मदत द्यावी, अशी माणगी शेतकऱ्यांतून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)

जिल्ह्यात सरासरी १९.३९ मिमी पाऊस
जिल्ह्यात शुक्रवारी सर्वत्र पावसाचे आगमन झाले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सरासरी १९.३९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून एकूण १५५.१० मिमी पाऊस झाला आहे. यात वर्धा तालुक्यात १० मिमी, सेलू २५, देवळी ८.२०, हिंगणघाट ८.१०, समुद्रपूर १०.४०, आर्वी ३०, आष्टी ४२ आणि कारंजा तालुक्यात २१ मिमी पावसाची नोद करण्यात आली. शुक्रवारचा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र कोसळल्याने शेतातील कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी पेरणीकरिता दमदार पावसाची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Electricity kills the bullocks with the touch of the wires