मुख्याध्यापकाचे पद वाचविण्यासाठी दाखविले बोगस विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 06:00 AM2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:27+5:30

शहरालगतच्या सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालीनी पखाले यांनी २०१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये स्वत: चे व एका सहाय्यक शिक्षकाचे पद वाचविण्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेकरिता तब्बल ४१ बोगस विद्यार्थ्यांची दाखलखारीजवर नोंद केली.

Bogus student shown to save head office | मुख्याध्यापकाचे पद वाचविण्यासाठी दाखविले बोगस विद्यार्थी

मुख्याध्यापकाचे पद वाचविण्यासाठी दाखविले बोगस विद्यार्थी

Next
ठळक मुद्देकारवाई शून्य : सावंगी (मेघे) च्या जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंतच्या संच मान्यतेनुसार शाळांना शिक्षकांची पदे मंजूर केली जाते. त्यामुळे शाळेतील अतिरिक्त ठरणाऱ्या सहायक शिक्षकासह मुख्याध्यापकाचे पद वाचविण्यासाठी तब्बल ४१ विद्यार्थी बोगस दाखविले. त्यामुळे पटसंख्या नसतानाही हे दोन्ही पदे कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सुरु घडल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, याकडे शिक्षण विभागाचा कानाडोळा होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरालगतच्या सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालीनी पखाले यांनी २०१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये स्वत: चे व एका सहाय्यक शिक्षकाचे पद वाचविण्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेकरिता तब्बल ४१ बोगस विद्यार्थ्यांची दाखलखारीजवर नोंद केली. त्यामुळे ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेत या शाळेतील पटसंख्या १४५ वर पोहोचली.
या पटसंख्येनुसार शाळेतील कोणतेही शिक्षक अतिरिक्त ठरले नाही. मात्र संचमान्यतेनंतर लगेचच या ४१ विद्यार्थ्यांना दाखले देऊन कमीही करण्यात आले. पण, यासंदर्भात शिक्षण विभागाला कोणतीही माहिती दिली नाही. या बोगस विद्यार्थ्यांना दाखले दिल्यानंतर शाळेती पटसंख्या केवळ १०४ वर आली आहे. याच बनावट विद्यार्थ्यांच्या आधारे मुख्याध्यापक व सहायक शिक्षक नियमानुसार अतिरिक्त असतानाही वर्षभरापासून शासनाचे वेतन घेत आहे. याची माहिती पंचायत समिती शिक्षण विभागाला असूनही शिक्षण विभागाने डोळे मिटल्यामुळे कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. याबाबत माहिती जाणून घेण्याकरिता पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी धनराज तायडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
वर्षिक तपासणीत झाला होता खुलासा
सावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष खिराळे यांनी ३ एप्रिल २०१८ रोजी वार्षिक तपासणी केली होती. यावेळी त्यांनी वर्ग १ ते वर्ग ७ पर्यंत सर्व वर्गाची तपासणी केली असता या शाळेतील उपस्थित पटसंख्या आणि शिक्षकांची मंजुरपदे याबाबत तफावत दिसून आली होती. इतकेच नाही तर संचमान्यतेपूर्वी वाढविलेले ४१ विद्यार्थी नंतर कमी झाल्याचे दिसून आले. पण, ते विद्यार्थी कोणत्या शाळेत गेले याची माहिती मुख्याध्यापकांना व शिक्षकांना नव्हती. असेही त्यावेळी तयार केलेल्या अहवालात नमुद करण्यात आले होते. मात्र, वर्ष लोटूनही शिक्षण विभागाकडून कारवाई केली गेली नाही. यामुळे याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Bogus student shown to save head office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.