उत्तर प्रदेशातील औद्योगिक शहर असलेल्या नोएडामध्ये सोमवारी (१३ एप्रिल २०२६) पगारवाढीच्या मागणीवरून कामगारांच्या आंदोलनाने अत्यंत हिंसक वळण घेतले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली आणि अनेक वाहने पेटवून दिली. या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ६० हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. सध्या नोएडामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स आणि पीएसीच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्हा दंडाधिकारी मेधा रुपम यांनी कामगारांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
नेमकी घटना काय?
नोएडाच्या फेज-२ मधील होजिअरी कॉम्प्लेक्स आणि सेक्टर ६० मधील सहा मोठ्या कंपन्यांमधील हजारो कामगार गेल्या काही दिवसांपासून पगारवाढीसाठी आंदोलन करत होते. सोमवारी सकाळी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. हरयाणा सरकारने ज्याप्रमाणे किमान वेतनात ३५ टक्के वाढ केली आहे, तशीच वाढ उत्तर प्रदेश सरकारनेही करावी, अशी मुख्य मागणी या कामगारांची होती.
हिंसाचारात मोठे नुकसान
संतप्त कामगारांनी पोलिसांच्या गाड्यांसह खाजगी वाहनांना लक्ष्य केले. पोलिसांच्या एका एसयूव्हीसह अनेक गाड्या आंदोलकांनी पेटवून दिल्या. औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांच्या काचा फोडण्यात आल्या आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. आंदोलनामुळे दिल्ली-नोएडा जोडणारा चिला बॉर्डर मार्ग आणि एनएच-९ वर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांची कारवाई, ६० जणांना अटक
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सौम्य लाठीमार केला. गौतम बुद्ध नगरच्या पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ४२,००० कामगार रस्त्यावर उतरले. यातील ७८ ठिकाणी चर्चा करून आंदोलन शांत करण्यात आले, मात्र २ ठिकाणी हिंसाचार झाला. आतापर्यंत याप्रकरणी ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे कामगार मंत्र्याचा खळबळजनक दावा
या हिंसक आंदोलनावर उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर यांनी खळबळजनक विधान केले. हे आंदोलन म्हणजे एक कट असल्याचे सांगत त्यांनी याचे पाकिस्तान कनेक्शन' असल्याचा दावा केला आहे. आंदोलनादरम्यान काही चिथावणीखोर घटकांनी कामगारांना भडकवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Web Summary : Noida's labor protest over wages escalated into violence with stone-pelting and arson. Police arrested over 60. Investigations are ongoing, with claims of external instigation and a possible 'Pakistan connection'. Situation is currently under control.
Web Summary : नोएडा में वेतन को लेकर श्रमिकों का विरोध प्रदर्शन हिंसक हो गया, जिसमें पथराव और आगजनी हुई। पुलिस ने 60 से अधिक लोगों को गिरफ्तार किया। जांच जारी है, बाहरी उकसावे और 'पाकिस्तान कनेक्शन' के दावे किए जा रहे हैं। स्थिति नियंत्रण में है।