Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 06:54 IST

Mumbai Crime News: मुंबईतील गोरेगाव नेस्को संकुलातील लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना सोमवारी उजेडात आली.

 मुंबई - मुंबईतील गोरेगाव नेस्को संकुलातील लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना सोमवारी उजेडात आली. शनिवारी मुलांनी ड्रग्ज घेतले होते. सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नेस्कोच्या एक्झिबिशन सेंटरने हे आयोजन केले होते. याप्रकरणी नेस्कोच्या इव्हेंट आणि एक्झिबिशनच्या व्हॉइस प्रेसिडेंट व व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांसह एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेस्कोकडून आयोजित लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये जमुनालाल कॉलेजचे हे दोन एमबीएचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचे समजते.

काय घडले नेमके नेस्को संकुलात शनिवारी रात्रीच्या कॉन्सर्टमध्ये?शनिवारी (११ एप्रिल) नेस्को संकुलात तीन ते चार हजार तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. यावेळी अत्यधिक प्रमाणात मद्यपान केल्याने आणि ड्रग्ज घेतल्यामुळे काही तरुण-तरुणींना त्रास झाला. प्रकृती खालावल्यामुळे दोघींना जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात तर एका मुलाला गोरेगाव पश्चिमेतील लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लाईफलाईन रुग्णालयात दाखल तरुणाचा सोमवारी मृत्यू झाला. ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल एका तरुणीला डिस्चार्ज दिल्यानंतर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिचाही सोमवारीच मृत्यू झाला असून दुसरीवर अद्याप उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

पोलिसांची गोपनीयता : याप्रकरणात नेस्कोच्या अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा सहभाग समोर येताच वनराई पोलिसांनी गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालांची प्रतीक्षा आहे.  पोलिस अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क करूनही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. मुंबई पोलिसांच्या ड्रग्स विरोधी कारवाईबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Shaken: Drug Overdose at Concert Kills Two Students

Web Summary : Two students died from drug overdose at a Mumbai concert. Nesco officials, among five, arrested. One woman is critically ill. Police investigate.
टॅग्स :मुंबईगुन्हेगारीअमली पदार्थ