Shree Swami Samarth Punyatithi 2026: बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. चैत्र शुद्ध द्वितीया हा स्वामींचा प्रकट दिन असतो. तर चैत्र महिन्याच्याच वद्य पक्षातील त्रयोदशीला अक्कलकोट येथे स्वामींची अवतारकार्याची सांगता केली. स्वामींनी अवतारकार्याची सांगता करताना भाविकांना कालातीत वचन दिले आहे. शेवटचा शब्द स्वामी आजही पाळतात, असा अनेकांना अनुभव असल्याचे म्हटले जाते. सुखी जीवनाची वचने स्वामींनी सांगून ठेवली आहेत.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. स्वामी म्हणतात की, जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. आळशी माणसाचे तोंडपाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा. जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिऊ नकोस! पुढें जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा,राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु, तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा. हम गया नही जिंदा है.
स्वामी स्वतः दर्शन, प्रचिती देतात हा भक्तांचा अनुभव
मनाच्या गाभाऱ्यातून अंतर्मनाने स्वामींना साद घातली, तर स्वामी स्वतः दर्शन, प्रचिती देतात हा भक्तांचा अनुभव आहे. स्वामी म्हणजे स्वः मी, माझ्याजवळ येताना तू तुझ्यातील ‘मी’ ला सोडून ये, तरच मी तुला दिसेन असेच जणू त्यांना सुचवायचे आहे. स्वामींनी देह ठेवताना भक्तांना वचन दिले आहे, जो माझे नाम घेईल, खऱ्या मनाने माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम, चरितार्थ मी चालवीन. पण म्हणून आपण नुसते बसून उपयोग नाही. प्रपंच सांभाळून परमार्थ करावा, हेच अपेक्षित आहे स्वामींना!
संजीवनी तारक मंत्रांचा अर्थ समजून म्हणावा
- निशंक हो ! निर्भय हो! मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे । अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।
कुठलीही शंका घेऊन माझे नाम घेऊ नको, माझी सेवा करू नको, अत्यंत निर्भय हो, कारण आता तू माझ्यावर सर्व सोपवले आहेस. ज्या क्षणी आपण तारक मंत्रात दिल्याप्रमाणे कुठलेही भय न ठेवता आणि कुठलीही शंका न घेता तारक मंत्र म्हणतो, त्यावेळी आपल्याला आपल्या पाठीशी असलेली त्यांची शक्ती कळेल. आपल्या पाठी उभे असलेले स्वामी बळ इतके प्रचंड आहे, की त्यावर आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो. त्यांच्या नुसत्या स्मरणानेही ते आपल्या हाकेला धावून येतात. त्यांची शक्ती अवकलनाच्याही पलीकडे आहे. प्रत्यक्षात कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करतील ह्यात शंकाच नाही. पण कधी? जर त्यांना ते वाटले तर आणि तरच. उठसूट सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात.
- जिथे स्वामी पाय, तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय ।आज्ञेविना काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भिती तयाला ।।२।।
आपण स्वामी चरण कधीच सोडू नयेत, कारण स्वामींच्या पायाशीच सर्व विश्व आहे. भक्ताचे प्रारब्ध घडवणाऱ्या आपल्यावर मायेची पखरण करणाऱ्या स्वामींना त्रिवार वंदन. हा इहलोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञेशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळही नेऊ शकणार नाही, अशी ही अलौकिक शक्ती आहे. परलोकातही आपल्याला भिण्याचे कारण नाही कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजेच स्वामी .
- उगाची भितोसी, भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे ।जगी जन्म-मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।
प्रपंचातील लहानसहान गोष्टीनी आपण सशासारखे घाबरतो, भय आपली पाठ सोडत नाही. आपल्या जीवाला शांतता मिळत नाही. म्हणूनच स्वामी सांगतात अरे वेड्या, लहान-सहान गोष्टींना उगाच कशाला भीतोस? तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे, तिला ओळखायला शिक. हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे. पण, आपण स्वामी सेवेत आहोत, त्यांचे बालक आहोत ह्याची खूणगाठ मनी ठेव.
- खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त ।कितीदा दिला बोल! त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।
स्वामींवर गाढ श्रद्धा असेल तरच तुला स्वामी या शब्दांचा अर्थ समजू शकेल आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तू स्वामी भक्त होऊ शकणार नाहीस. आयुष्यात अनेक प्रसंगात तारणारे स्वामीच आहेत. कित्येक संकटातून बाहेर काढणारे तारणहार स्वामीच आहेत. त्यांनी किती वेळा हात दिला, त्याचा विचार कर, अखेरच्या श्वासापर्यंत ते साथ देणार आहेत तेव्हा न डगमगता पुढे जात राहा.
- विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच ह्या पंचप्राणामृतात ।हे तीर्थ घे, आठवी रे प्रचिती, न सोडी कदा, स्वामी ज्या घेई हाती ।।५।।
प्राण, अपान, उदान, व्यान, समान या पंचप्राणामध्ये स्वामीच आहेत. स्वामीची विभूती आणि तीर्थ यातही स्वामींचा अंश आहे. हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा बाहेर काढले, प्रचिती दिली ते आठव. श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत ही खूणगाठ मनाशी ठेव.
Web Summary : Shree Swami Samarth Punyatithi is on April 15, 2026. Swami gave devotees a timeless promise: 'Fear not, I am behind you.' He assured devotees of his presence, urging unwavering faith and selfless service. The Sanjeevani Tarak Mantra offers guidance and protection, ensuring Swami always supports his devotees.
Web Summary : श्री स्वामी समर्थ पुण्यतिथि 15 अप्रैल, 2026 को है। स्वामी ने भक्तों को एक कालातीत वादा दिया: 'डरो मत, मैं तुम्हारे पीछे हूं।' उन्होंने भक्तों को अपनी उपस्थिति का आश्वासन दिया, अटूट विश्वास और निस्वार्थ सेवा का आग्रह किया। संजीवनी तारक मंत्र मार्गदर्शन और सुरक्षा प्रदान करता है, यह सुनिश्चित करता है कि स्वामी हमेशा अपने भक्तों का समर्थन करें।